लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांवर कोरोनाच्या रूपात नैसर्गिक संकट आले. उद्योग, व्यापार सर्व बंद असल्यामुळे लोकांच्या खिशात पैसे नाहीत. दुसरीकडे सरकारने तीन महिन्याचे बिल एकत्र पाठवले. इतकेच नव्हे तर १ एप्रिल २०२० पासून २१ टक्के वाढीव बिल पाठवण्यात आले. त्यामुळे सामान्य माणूस हे बिल भरू शकत नाही. जनतेवर नैसर्गिक संकट येते तेव्हा सरकार त्याच्या मदतीसाठी पुढे येते. त्यामुळे कोरोना काळातील वीज बिल सरकारनेच भरावे, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे.
या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात १०० ठिकाणी धरणे व ठिय्या आंदोलन करण्यात आले. नागपुरात व्हेरायटी चाैक, सीताबर्डी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे, या मागणीसोबतच २०० युनिटपर्यंत वीज बिल फ्री करण्यात यावे, त्यानंतरचे वीज दर निम्मे करावे. कृषी पंपाचे वीज बिल संपवण्यात यावे व विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीसााठी सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदाेलनात मुकेश मासुरकर, अरुण केदार, विष्णूजी आष्टीकर, रेखा निमजे, सुनीता येरणे, गुलाबराव धांडे, प्रशांत मुळे, ज्योती खांडेकर, अरुण भोसले आदींसह मोठ्या संख्येने विदर्भवादी सहभागी झाले होते.
बॉक्स
...अन्यथा ऊर्जामंत्र्यांच्या घराला घेराव
कोरोना काळातील वीज बिलाबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर यापुढे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.