कचरा संकलनासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा : मनपा नवा पॅटर्न राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:04 PM2019-02-14T22:04:07+5:302019-02-14T22:05:56+5:30
स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाणार आहे.
मार्च महिन्यात मे. कनक रिसोर्सेस मॅनजमेंट प्रा. या एजन्सीचा कंत्राट संपत आहे. यामुळे नवीन व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया व नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी दिली.
कचरा संकलन हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यात घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. ओला, सुका व जैविक कचरा वेगवेगळा संकलित केला जाणार आहे. अशा प्रकारची वाहने उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक झोनक्षेत्रात ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. भविष्यात डम्पिंगयार्डची गरजच भासणार नाही. आरोग्य विभाग मागील सहा महिन्यांपासून यावर काम करीत आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. देशात अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा असलेल्या शहरांचा अभ्यास दौरा करून माहिती संकलित केली आहे. ज्या भागात मोठी वाहने जाणे शक्य होणार नाही, अशा ठिकाणी ई-रिक्षांच्या माध्यमातून कचरा संकलित केला जाणार आहे. तसेच डम्पिंगयार्ड येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्यात येईल. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे.
दहा वर्षात एक हजार कोटींचा खर्च
‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. यासाठी १० वर्षांच्या कालावधीसाठी निविदा मागविण्यात येणार आहे. नागपूर शहरात दररोज ८०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यावर दहा वर्षाच्या कालावधीत सुमारे एक हजार कोटींचा खर्च येणार आहे. याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
वॉकीटॉकीच्या माध्यमातून नियंत्रण
शहरातील कचरा संकलन, त्यावर प्रक्रिया व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा राहणार आहे. या यंत्रणेचे संचालन नियंत्रण कक्षातून केले जाईल. वाहनांना सूचना देण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे.