हरभरा निघाला, खरेदी केंद्र कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:09 AM2021-02-07T04:09:05+5:302021-02-07T04:09:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : रबी हंगामातील नगदी आणि हमखास उत्पादनाचे पीक म्हणून हरभरा पिकाकडे बघितले जाते. यंदा थोडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : रबी हंगामातील नगदी आणि हमखास उत्पादनाचे पीक म्हणून हरभरा पिकाकडे बघितले जाते. यंदा थोडा फार फटका हरभरा उत्पादनावरही पडला. हरभऱ्याच्या कापणीला आता वेग आला असून, उत्पादित शेतमाल घराकडे पोहोचत आहे. सुमारे आठवड्यापासून चणा बाजारपेठेतही आणला जात आहे. अशावेळी दुसरीकडे शासकीय चणा खरेदी केंद्राचा अद्याप थांगपत्ता नाही. चणा निघाला, खरेदी केंद्र कधी सुरू होणार, अशी विचारणा करण्यासाठी उमरेड खंविसकडे शेतकरी चकरा मारीत आहेत. दुसरीकडे अद्याप परिपत्रक यायचे आहे, असे उत्तर मिळत असल्याने शेतकरी आल्यापावली परत जात आहेत.
उमरेड तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र १३,७०० हेक्टर आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी हरभऱ्याला अधिक पसंती देत असल्याने यंदा पेरणी क्षेत्र वाढले. त्यानंतर सुरुवातीला मर रोग, पाने खाणारी अळी आणि नंतर घाटेअळी यामुळे शेतकरी कमालीचे हतबल झाले. आता येणाऱ्या काही दिवसात कापणी आणि काढणीच्या कामाला प्रचंड वेग येणार आहे. हरभऱ्याला यंदा ५,१०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे बाजारपेठेत ४,४०० पर्यंत भाव मिळत आहे. यामुळे क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयाची तफावत असल्याने, अधिकांश शेतकऱ्यांच्या नजरा शासकीय चणा खरेदी केंद्राकडे खिळल्या आहेत. तातडीने सदर केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
....
मजुरीचे दर गगनाला
कापूस वेचा आणि हरभरा कापणी अशी एकाच वेळी दुहेरी कामाची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे शेतमजूर उपलब्ध होत नसल्याने आपसूकच मजुरीचे दर गगनाला भिडल्याचे चित्र आहे. तूर्त शेतमजुरी २५० ते ३५० रुपयापर्यंत पोहोचली असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात अधिकच्या खर्चाची भर पडत आहे.
....
तूर नोंदणीसाठी पाठ
तूर कापणीलासुद्धा वेग आला असून, तुरीला बाजारात ६,५०० ते ६,६०० रुपये दर मिळत आहे. तुरीची शासकीय खरेदी केंद्राच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुरीला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. हमीभावापेक्षाही बाजारभाव अधिक मिळत असल्याने अधिकांश शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. उमरेड विकास खंड सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीकडे सदर एजन्सीचे काम सोपविण्यात आले असून, अद्याप नोदणीच झाली नसल्याची बाब समितीचे अध्यक्ष राजेराम झाडे, व्यवस्थापक जी. एम. ढोले यांनी सांगितली.