रामटेक (नागपूर) : राज्यातील सत्तापरिवर्तनात रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी शिंदे गटाला साथ दिली. आता रामटेक मतदारसंघात होऊ घातलेल्या रामटेक तालुक्यातील ८ आणि पारशिवनी तालुक्यातील २२ ग्रा.पं.च्या निवडणुकीत मतदार बाळासाहेबांच्या शिवसेनेला साथ देतील का? याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर गावागावांत राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. रामटेक, पारशिवनीत शिंदे गटाचे पानिपत करण्यासाठी कॉंग्रेसला ताकद लावावी लागणार आहे. याशिवाय भाजपला अस्तित्व टिकविण्यासाठी नव्या दमाने संघर्ष करावा लागणार आहे. रामटेक पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत असतानाही शिंदे गटाने हात मारला.
जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडणुकीत आदिवासी समाजाच्या शांता कुमरे यांना काँग्रेसने डावलले. याचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रामटेक तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या ज्या मोठ्या ग्रामपंचायत आहेत, यात मनसर, नगरधन, मुसेवाडीचा समावेश आहे. आसोली, भिलेवाडा, आजनी पटगोवारी, हिवराहिवरी या छोट्या ग्रामपंचायती आहेत. गत निवडणुकीत मनसर व भिलेवाडा शिवसेनेकडे होत्या. नगरधन, मुसेवाडी, पटगोवारी, आसोली ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात होती.