लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांचे खरे कार्य अध्यापनचे आहे की शिक्षण सोडून इतर अवांतर कामासाठी शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, असा सवाल आता करायला लागले आहे. कारण शिक्षकांना शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक कामात गुंतविण्यात येत आहे. आता खंडविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ग्रामपंचायत सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्तीही केली आहे.गेल्या १५ दिवसापासून ग्रामसेवकांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासन ठप्प झाले आहे. गावगाड्याचा कारभार थांबला आहे. नालेसफाई, स्वच्छता, पाणी शुद्धता, जंतुनाशक फवारणी अशाप्रकारची दैनंदिन गरजेची कामे सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप पसरला आहे. शासनाकडून ग्रामसेवकांचा संप मिटविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. उलट ग्रामसेवकांचे काम शिक्षकांकडून करून घेण्याचा प्रयत्न जि.प.प्रशासनाकडून केल्या जात असल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांची कामे पुढील आदेशापर्यंत मुख्याध्यापाकांनी करण्याबाबत पं.स.मौदा ,कळमेश्वर व भिवापूरच्या खंडविकास अधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले असून त्याबाबतचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.अगोदरच अशैक्षणिक कामाच्या विळख्यात अडकलेल्या शिक्षकांच्या मागे पुन्हा एक प्रकारचे अशैक्षणिक काम लावून जि.प प्रशासन शिक्षकांना शैक्षणिक कामापासून परावृत्त करण्यात येत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. शिक्षकांनी आता शैक्षणिक कार्य सोडून अशैक्षणिक कामेच करायची काय ? एकीकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवायचे आणि दुसरीकडे शैक्षणिक गुणवत्ता ढासळली म्हणून शिक्षकांच्या नावाने बोंबा मारायच्या असा संताप सुद्धा शिक्षकांनी व्यक्त केला. यापूर्वी दोन वषार्पूर्वी अंगणवाडी सेविकांच्या संपात सुद्धा अंगणवाडीतील आहार वाटपाचे काम शिक्षकांकडे देण्यात आले होते. आदेश परत घ्या, अन्यथा आंदोलनअध्यापनाचे कार्य सोडून वाट्टेल त्या कामाला लावायला शिक्षक हे कुणी वेठबिगार नाही. कुणी संपावर गेले, कुठे कर्मचारी कमी आहे त्या-त्या ठिकाणी पर्याय म्हणून शिक्षकांची सेवा घ्यायची आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचा डिंडोरा पिटायचा ही प्रशासनाची भूमिका निंदनीय व संतापजनक आहे. कुणीही शिक्षक ग्रामसेवकांचे तात्पुरते कार्य करणार नाही. संबंधित खंडविकास अधिकाºयांनी निर्गमित केलेले आदेश परत घ्यावे अन्यथा याविरोधात आंदोलन उभारले जाईल.लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
गुरुजींना दिली ग्रामपंचायतीची जबाबदारी : शिक्षकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:45 PM
खंडविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ग्रामपंचायत सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्तीही केली आहे.
ठळक मुद्देग्रामसेवकाच्या संप मिटेपर्यंत मुख्याध्यापकांची केली नियुक्ती