लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या शहरातील २ पोलिसांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलीस जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावरील पोलिसाचामृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना विमा कवच आणि सानुग्रह साहाय्य अनुदान म्हणून ५० लाख रुपये प्रदान करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. नागपुरात पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार भगवान सखाराम शेजुळ तसेच धंतोली ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सिद्धार्थ हरिभाऊ सहारे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळावी म्हणून पोलीस आयुक्तालयातून पोलिस महासंचालक कार्यालयात पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार शेजुळ आणि सहारे यांच्या वारसदारांना धनादेश देण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यानुसार आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हिरा सिद्धार्थ सहारे यांना तर सहपोलीस आयुक्त नीलेश भरणे यांच्या हस्ते कुसुम भगवान शेजुळ यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. आयुक्तालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, मुख्यालय प्रमुख राम शास्त्रकार आणि समाधान कक्षाच्या पोलीस शिपाई रिता कोहरे उपस्थित होत्या. यापुढेही कोणतीही अडचण आल्यास तुमच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण शहर पोलीस दल भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.
मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाखाचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:18 PM