साेयाबीन पिकावरील खाेडमाशी, गर्डल बिटल घातक कीड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:30+5:302021-07-19T04:07:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : परिसरातील साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशी व गर्डल बिटल या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : परिसरातील साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशी व गर्डल बिटल या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या दाेन्ही किडी घातक असून, उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडींचे वेळीच याेग्य व्यवस्थापन करून बंदाेबस्त करावा, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी केले आहे.
साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशीचा प्रादुर्भाव उगवणीनंतर १० ते १५ दिवसांपासून तर कापणीपर्यंत हाेऊ शकताे. प्राैढ माशी २ मिमीची तर अळी ३ ते ४ मिमीची, फिक्कट पिवळी व विना पायाची असते. काटाेल तालुक्यात किमान ८० टक्के साेयाबीनच्या पिकावर या खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे, अशी माहिती डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.
ही अळी साेयाबीनच्या झाडाच्या खाेडात प्रवेश करीत असून, ती १५ ते १५ दिवस खाेडात राहात असल्याने या काळात ती खाेड आतून पाेखरते. त्यामुळे अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण हाेत असल्याने झाडे अकाली पिवळी पडायला सुरुवात हाेते. काही शेतातील झाडे हिरवी दिसत असली तरी त्या झाडांच्या खाेडात अळी व तिची विष्ठा आढळून येते. त्यामुळे सध्या साेयाबीनचे पीक चांगले दिसत असले तरी या किडीचा वेळीच बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. कालांतराने ही झाडे पिवळी पडू लागतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे साेयाबीनच्या उत्पादनात किमान ६० टक्के घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफिल न राहता या किडीचा वेळीच बंदाेबस्त करावा, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी केले आहे.
....
या उपाययाेजना करा
खाेडमाशी व गर्डन बिटलच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी पेरणी करताना थायमेथाॅक्झाम या औषधाची बीजप्रक्रिया केली नसेल तर पेरणीनंतर शेतात एकरी ६४ चिकट सापळे ८ ते १० मीटर अंतरावर लावावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी थायमेथाॅक्झाम, लॅम्बडा सायलाेथ्रीन किंवा इथीऑन या कीटकनाशकांची पहिली व काही दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीला क्लाेरानट्रॅनिपाॅल किंवा इडाेक्झिकार्ब या कीटकनाशकांनी १५ दिवसांनी फवारणी करावी. पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी इमामेक्टीन बेंझाेएटची फवारणी केल्यास खाेडमाशीसाेबतच चक्रीभुंगा व तंबाखूची पाने खाणारी अळी याही किडींचा बंदाेबस्त हाेताे, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.