कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी : विद्यापीठाचा पारितोषिक वितरण समारंभ
नागपूर : विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व वाढवत असताना वडाच्या झाडाप्रमाणे सर्वांना सर्वदृष्टीने उपयोगी होईल असे तयार करा, ताडाच्या झाडासारखी उंची वाढल्यास समाजाला त्याचा उपयोग होणार नाही, अशी भावना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी केले.
विद्यापीठाचा ९ जुलै रोजी दीक्षांत समारंभ पार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पडला. परंतु कोरोनामुळे विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. त्यासाठी सोमवारी विद्यापीठाने स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, डॉ. राजेश सिंगरू, डॉ. संजय कविश्वर, डॉ. निर्मलकुमार सिंग व डॉ. राजश्री वैष्णव उपस्थित होते.
या पारितोषिक वितरण समारंभात १०७ विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. डॉ. तुळशीराम गेडाम व डॉ. रत्नाकर भेलकर यांना मानव विज्ञान पंडित पदवी प्रदान करण्यात आली. प्राची गिरधारीलाल अग्रवाल यांना विधी अभ्यासक्रमामध्ये सर्वाधिक पदके प्राप्त केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले. आभार डॉ. राजू हिवसे यांनी मानले.