लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड आपत्तीमुळे लागू झालेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन एज्युकेशन सुरू झाले. सलग सात महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेज लॅपटॉप व मोबाईलवर सुरू आहेत. याचा परिणाम आता दिसून येत आहे. मुलांमध्ये ‘मोबाईल अॅडीक्शन’चे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय, सततच्या ‘स्क्रीन टाइम’चा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊन अंधुक दिसण्याची समस्या वाढली आहे.
नागपूर शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २७३६२८ आहे. हीच संख्या ग्रामीण भागात साधारण १३९२७१४ आहे. जून-जुलैपासून बहुसंख्या शाळांनी ‘ऑनलाईन एज्युकेशन’ला सुरुवात केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या मोबाईलचा वापर केला. परंतु दोघांचाही अडचणी वाढल्याने पालकांनी मुलांना स्वतंत्र स्मार्ट फोन घेऊन दिला. मागील सहा-सात महिन्यांपासून बहुसंख्य मुले स्मार्ट फोन, लॅपटॉप व संगणकावर चिटकून आहेत. आता ९ ते १२ वीचे वर्ग सुरू झाले असले तरी अनेकांच्या हातून मोबाईल सुटलेला नाही. लहान मुले तर सकाळी व रात्री मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. सुरुवातीला मुलगा काय शिकतोय हे पाहणारे पालकही नंतर कंटाळले. त्यांनी दुर्लक्ष करताच मुले मनोरंजनाचा मोहात अडकली आहेत. मोबाईल गेम्स व फिल्म्स पाहण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मुलांमध्ये मोबाईलचे वाढते अॅडीक्शन आता पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मोबाईल आजाराची लक्षणे
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमाणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मोबाईलचा वापर दरदिवसाला वाढणे, वापर न केल्यास अस्वस्थ वाटणे, मोबाईल वाजल्याचा सतत भास होणे, मोबाईलवर सतत गेम खेळणे, चित्रपट पाहणे, सेल्फी घेण्याचा नाद निर्माण होणे, मोबाईल हातात नसताना बोटाच्या हालचाली होणे, मोबाईल जवळ नसला तरी तो वाजल्याचा आवाज येणे ही मोबाईलच्या आजाराची लक्षणे आहे. यातून पुढे छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन ताण निर्माण होऊन नैराश्य येऊ शकते.
‘मायोपिया’ चा रुग्णात वाढ
मेयोच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण म्हणाले, कॉर्नियातील बिघाड, औद्योगिकीकरण, इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वाढता वापर, आनुवंशिकता, घरांमध्ये बसून तासनतास लॅपटॉपवर काम करणे किंवा मोबाईल पाहणे अशा विविध कारणांमुळे ‘मायोपिया’ म्हणजे अंधुक दिसण्याची समस्या वाढत आहे. मेयोच्या नेत्ररोग विभागात पूर्वी १०० मधून पाच ते सात रुग्ण यायचे, परंतु अलीकडे १० ते १५ रुग्ण येत आहेत.
काय करावे
डॉ. सोमाणी म्हणाले, मुलांमधील मोबाईलचा अतिवापर कमी करण्यासाठी पालकांनी हिंसक होऊ नये. मुलांचा मोबाईलवरील वेळ निर्धारीत करावा. पालकांनी याची सुरुवात स्वत:पासून करावी. जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवावा. काही असे ठिकाण ठरवावे जिथे मोबाईलचा वापर करूच नये, जसे जेवताना, झोपताना मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावे. कुटुंबासोबत फिरायला गेले असताना मोबाईलचा कमीतकमी वापर करावा, मोबाईलमध्ये असे काही अॅप्स टाकावे ज्यामध्ये कोणते अॅप्स कितीवेळ पहावे ते सांगते, आदीचा फायदा होतो.
विद्यार्थ्यांची संख्या
नागपूर शहर
१ ते ८ वा वर्ग-१३२०००
९ ते १२ वा वर्ग-१४१६२८
नागपूर ग्रामीण
१ ते ८ वा वर्ग-११०३२०
९ ते १२ वा वर्ग-१२८९५५