‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार म.रा. जोशी यांना प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 04:45 PM2019-08-18T16:45:13+5:302019-08-18T16:48:47+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राची भूमी संतसाहित्याद्वारे भावार्थाशी जुळला आहे. येथेचे नव्हे तर येथील संस्कृतित सापडणारे शिलालेख आणि पोथ्यांमध्ये आपला पुरातन इतिहास दडलेला आहे. त्यातील भावार्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, असे कार्य होणे अपेक्षित असल्याची भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य म.रा. जोशी यांनी आज येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी पंढरपूर संस्थानचे माजी पुजारी बडवे यांनी संस्थानकडून तुळशीमाळ, कुंकू, उपरणे, पोथी आणि प्रसाद अर्पण करून जोशी यांचा सत्कार केला.
या भूमीत महानुभाव, दत्त, नाथ, वारकरी संप्रदाय निर्माण झाले आणि त्यावर कळसही चढविला गेला. वारकऱ्यांप्रमाणेच रामदासी पंथाने प्रचंड ग्रंथसंपदा दिली. या प्रत्येक संप्रदायाच्या ग्रंथांचे अभ्यास करताना, त्यातील चिंतन उलगडत गेले. मुस्लिम संप्रदायामध्ये दर्गे नाही. मात्र, महाराष्ट्रात ते आढळतात. या दर्ग्यांची देण हिंदू साधूंच्या समाधीतून मिळाली असल्याचे जोशी यावेळी म्हणाले. ही भूमीच देवाशी नाते सांगणारी असल्याने, येथील प्रत्येक चिंतनात सामान्य जणांचे भाव व्यक्त होत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपारिक अभंगासोबतच महेंद्र पेंढरकर यांच्या नव्या भक्तीमय गीतांचा सुरेल भावमयी कार्यक्रम ‘भक्तीरंग’ सादर झाला. प्रथमेश लघाटे, शरयू दाते, गुणवंत घटवई आणि सोनाली दीक्षित यांनी.. सावळाची, सावळे सुंदर, या पंढरीचे सुख, खेळ मांडियेला, आम्हा नकळे ज्ञान, काय शोधिसी तू, हरी भजना, बोलावा विठ्ठल, रवी तेजाने नाचत, जीवन पाण्याचा, रूणूझुणू रे भ्रमरा.. आदी अभंग सादर केले. संगीत संयोजन शैलेश दाणी यांचे होते. निरुपण रेणूका देशकर यांनी केले.