लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण अभ्यासकांनी नुकतेच अजनी वन परिसरात वनस्पती आणि पक्ष्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी संकलित केली आहे. या परिसरात गवतापासून ते अवाढव्य पिंपळापर्यंतच्या खाद्य वनस्पती, पुष्प वनस्पती, आयुर्वेदिक, औषधी महत्त्व असलेल्या वनस्पती व मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोडणाऱ्या वनस्पती मुबलक प्रमाणात असल्याचे दिसून आले. जवळपास ६० प्रजातींच्या हजारो वनस्पती या भागात आहेत. तर या झाडांवर ४० च्यावर प्रजातीचे पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास आहे.
सेंट्रल इंडिया बर्ड असोसिएशन (सिबा) व बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) च्या टीमने या भागात नुकतेच सर्वेक्षण केले. वनस्पती अभ्यासक प्राची माहूरकर तसेच पक्षी निरीक्षक अथर्व मंगरुळकर यांनी त्यांच्या सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. माहूरकर यांच्या टीमने ५६ प्रजातीच्या वृक्षांचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये ३९ प्रजाती स्थानिक तर इतर आयातीत आहेत. अथर्व मंगरुळकर यांच्या टीमने ४० प्रजातीच्या स्थानिक व प्रवासी पक्ष्यांच्या हालचाली टिपल्या आहेत. ही माेठी जैवविविधता आहे जी एखाद्या लहान वनक्षेत्राचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे इंटर माॅडेल स्टेशनच्या नावावर ही अनमाेल वनसंपदा ताेडणे म्हणजे पर्यावरणाचे माेठे नुकसान करण्यासारखे आहे.
अजनी म्हणजे आजीबाईचा बटवा
- मुबलक प्रमाणात चंदन, सागवन, पिंपळ, सिसम, बहावा, शिरीष, कडूलिंब, चिंच, काशिद, सोनमोहर, बांबू, करंज, बेल कदंब, निरगुडी आदी.
- खाद्य वनस्पती : सीताफळ, रामफळ, संत्रा, फणस, पेरू, नारळ, कॅसिया, शेवगा, चिकू, आवळा, बदाम, बोर, आंबा, चिचबिलाई,
- आयुर्वेद, औषधी महत्त्व : रिठा, आवळा, बेहडा, कडूलिंब, वावळ, महारूख, जंगली बदाम, उंबर, ब्रह्मदंड, निलगिरी, निवडुंग, बेल, मधुकमिनी
- पुष्प वनस्पती : सप्तपर्णी, कॅसिया, गुलमाेहर, चाफा, कळम, पारिजातक, कांचन, रेन ट्रि, बकूळ आदी.
आकर्षक पक्ष्यांचे वास्तव
- किंगफिशर, शिंपी, राॅक पिजन (जंगली कबूतर), काेकीळ, गाेल्डन ओरिओल, बुलबूल, मैना, इंडियन राॅबिन, टिकल्स ब्ल्यू फ्लायकॅचर, पर्पल सनबर्ड, चिमणी, प्रिनीया, हळद्या, वेडा राघू, भारद्वाज, नीलिमा, तांबुला आदी.
- अमेरिकेहून आलेले वाॅबलर व हिमालयातील फ्लायकॅचर अशा काही हिवाळी प्रवासी पक्ष्यांचे वास्तवही सध्या येथे आहे.
- एकाच झाडावर घरटे करून ५-७ वर्षे राहणाऱ्या घुबड प्रजातीचे मुबलक अस्तित्व येथे आहे.
- याशिवाय फुलपाखरे, सरपटणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व येथे आहे.
- तर स्टिंगलेस मधमाशीचे अस्तित्व धाेक्यात येइल
अथर्वने दिलेल्या माहितीनुसार सामान्य मधमाशीपेक्षा वेगळी स्टिंगलेस मधमाशीच्या १० च्यावर काॅलनीज येथे आहेत. ही मधमाशी छाेटी असते आणि चावा घेत नाही. या मधमाशीचे मध औषधी गुणांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते व मधुमेही रुग्णांसाठी संजिवनी मानले जाते. म्हणून ते महागही विकले जाते. प्रकल्पासाठी वृक्षताेड केल्यास त्यांचे अस्तित्वच धाेक्यात येइल, अशी भावना अथर्वने व्यक्त केली.