बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपी महिलेला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 08:35 PM2019-02-11T20:35:37+5:302019-02-11T20:37:59+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
पद्मा अरुण ठवरे (४४) असे आरोपीचे नाव असून ती टेका नाका, पाचपावली येथील रहिवासी आहे. १४ जुलै २०१७ रोजी तिने भाऊराव मेश्राम यांच्या सुशांत स्टिल सेंटरमधून ३०० रुपयांची भांडी खरेदी केली व मेश्राम यांना २००० रुपयाची नोट दिली. मेश्राम यांना त्या नोटेवर संशय आला. त्यामुळे त्यांनी महिलेला ओळख विचारली व पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच मेश्राम यांच्या दुकानात पोहचून पद्माची झडती घेतली असता तिच्याकडे २००० रुपयाच्या आणखी तीन बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणात ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सत्र न्यायालयाने पद्माला ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने तिचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.