वैश्विकतेचा हात की, बंदिस्त आयुष्याचा फास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:44 AM2019-07-17T11:44:39+5:302019-07-17T11:45:08+5:30

मोबाईल आणि मोबाईलवरील सोशल मीडियाचे सुपरिणाम कधी दुष्परिणामाकडे वळते झाले, याची साधी कल्पनाही मानवाने केली नसावी.

The hand of globalization, or life of a bandit alive? | वैश्विकतेचा हात की, बंदिस्त आयुष्याचा फास?

वैश्विकतेचा हात की, बंदिस्त आयुष्याचा फास?

googlenewsNext

प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
मानवाची स्थिती अगदी भस्मासूर-शिवकथेसारखी आहे. ‘ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील, तो भस्म होईल’ असा वर महादेवाकडून मिळविलेल्या भस्मासुराने, महादेवालाच भस्म करण्याचा चंग बांधला. अखेर, विष्णूने सर्वांगसुंदर मोहिनीचे रूप धारण केले आणि भस्मासुराला स्वत:कडे आकर्षित करून, नृत्यकौशल्याद्वारे त्यास स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवण्यास बाध्य केले आणि भस्मासूर भस्म झाला. अवघे ब्रम्हांड कवेत घेऊ इच्छिणाऱ्या मानवाची वाटचालही भस्मासुराच्या पदचिन्हावर सुरू आहे. त्याच शृंखलेत, मोबाईल आणि मोबाईलवरील सोशल मीडियाचे सुपरिणाम कधी दुष्परिणामाकडे वळते झाले, याची साधी कल्पनाही मानवाने केली नसावी. ‘ग्लोबल व्हिलेज’ या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करणारी ही मोबाईलची दुनिया, वैश्विकतेला हात देणारी जरूर ठरली. मात्र, या वैश्विकतेच्या अतिहव्यासाने मानवी आयुष्याला बंदिस्त करण्याचा फासच आवळल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच, अवघे जग आता त्या दुष्परिणामाला टोलविण्याच्या उपायांवर कार्य करत आहे. मात्र, ‘थ्री-जी’, ‘फोर-जी’ कडून ‘फाईव्ह-जी’ झालेली आगेकूच बघता, ते उपाय परिणामकारक ठरतील का? असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे.
डोळे-मेंदू अन् अखेरचा श्वास!
‘पबजी’ या मोबाईल गेममुळे, मृत्यू ओढवल्याच्या घटना ताज्याच आहेत. दोनच दिवसांपूर्वी उमरेड येथील एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू मोबाईलवर सातत्याने ‘पबजी’ खेळत असल्याने, ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे. पबजी किंवा बंदी घालण्यात आलेल्या ‘ब्ल्यू व्हेल’ सारख्या खेळांमध्ये विशेषत: मुले स्वत:ची सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसलेली असतात. अशा खेळाच्या ते इतक्या आहारी गेले असतात, की तो खेळ म्हणजेच विश्व, अशी त्यांची ठाम धारणा झाली असते. शरीरातील प्रत्येक घटकाचा संबंध मेंदूशी असतो. सतत मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे असल्याने, मेंदू बधीर व्हायला लागतो आणि मोबाईल स्क्रीन एवढेच त्याचे जग व्हायला लागते. तेथूनच, शरीराचे एक एक फंक्शन्स कधी विस्कळीत व्हायला लागतात, ते कळत नाही आणि आपण शेवटाच्या जवळ पोहोचलो आहोत, याची जाणीव अखेरचा श्वास घेईपर्यंत कळत नाही. अशा घटना देश-विदेशात उघडकीस आल्या आहेत.
‘टिक टॉक’ हा शब्द युवा वर्गासाठी फार जुना झाला आहे आणि म्हणूनच, सरकारने यावर बंदी घातल्यानंतर युवा मुखातून जो आगडोंब निघाला, त्याचा धसका घेत हे सोशल माध्यम पुन्हा सुरू करावे लागले. हा शब्द एका माध्यमासाठी वापरला गेला असला तरी, मोबाईलच्या स्क्रिनवरील ‘टिक टॉक’ मोबाईल युग अवतरल्यापासून सुरू झाली आहे. एका कंपास बॉक्ससारखी पेटी खिशात ठेवली की कुठेही आणि कुठूनही आप्तांच्या संपर्कात राहू शकेल, अशा यंत्रणेतून सुरू झालेला हा मोबाईल प्रवास नंतर ‘एसएमएस चॅट’, ‘व्हिडीओ रेकॉर्डींग’कडे गेला. त्याला इंटरनेटची जोड मिळाल्यानंतर, व्हॉट्सअपॅ, फिगो आदींद्वारे ‘आॅडिओ-व्हिडीओ चॅट’पर्यंत गेले आणि नंतर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हव्यास मानवाला मोबाईलवरच्या या सोशल मीडियांवर इतका व्यस्त करत गेला की तो इवल्याशा स्क्रिनवर सतत ‘टिक टॉक’ करू लागला. फावल्या वेळात मनोरंजनासाठी ‘मोबाईल गेम’ आणि त्याला ‘ग्रुप गेम’ची सांगड दिल्यानंतर तर हा सोशल मीडिया अतिभयंकर रूप धारण करू लागला आहे. यात विद्यार्थी आणि युवा वर्ग प्रचंड भरडला जात असल्याचे दिसून येते.
पालकांची भूमिका महत्त्वाची
आई-वडील आणि घरातील ज्येष्ठांसह वडीलधारी मंडळी, हेच मुलांचे पहिले मार्गदर्शक म्हणा वा प्रेरणास्रोत असतात. त्यांचे अनुकरण मुले करत असतात. मात्र, स्पर्धेच्या युगात पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, मुलांना अशा सोशल मीडियाकडे वळवत आहे. पालकांनी घरात प्रवेश करताच, मोबाईल टाळून मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधणे महत्त्वाचे ठरते. पायातली चप्पल दाराबाहेर जशी ठेवली जाते. तसेच, पालकांनी बाहेरच्या गोष्टी उंबरठ्याबाहेर ठेवून आणि मुलांशी आरोग्यवर्धक संवाद साधणे गरजेचे आहे. शिवाय, मुलांकडे असलेल्या मोबाईलची एक पालक म्हणून सतत तपासणी करणे, ते काय बघत आहेत आणि काय नाही, याची चौकशी करणे, त्यांना प्रत्येक गोष्टीची मर्यादा आणि बंधने घालून देणे, स्वत: करत असलेल्या कामांची माहिती देणे. असा संवाद ठेवल्यास मुलांना मोबाईल आणि सोशल माध्यमांकडे वळण्यास वेळच मिळणार नाही आणि गरजेपुरतेच मोबाईल आणि सोशल माध्यमांवर असावे, याची जाणीव दृढ होईल.
अतिवापरामुळे मुलांची बुद्धी होतेय खुजी
मुलांचे मन अतिसंवेदनशील आणि बुद्धी नवे ते स्वीकारण्याच्या सदा तयारीत असते. मोबाईल आणि मोबाईलवरील सोशल मीडिया, दर सेकंदाला अपडेट होणारी सिस्टीम असल्याने, मुले या माध्यमाकडे आपसूकच आकर्षिले जातात. अवघ्या जगाच्या घडामोडी आणि त्यावर उमटणारे व्हिडीओज, कधीही न आटणाऱ्या माहितींचा संग्रह यामुळे, मुले आणि विशेषत: युवा वर्ग सतत मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकावून असल्याचे दिसून येते. वैश्विक जगाशी जुळण्याच्या या नादामुळे मुले नजीकच्या संवादापासून अलिप्त होतात आणि एकलकोंडे होण्याची भीती बळावते आणि त्यांची मनोवृत्ती संकुचित होण्यास सुरुवात होते. अशी उदाहरणे आजूबाजूला अनेक दिसून येतील. त्याचा परिणाम वास्तविक अनुभव मिळणाऱ्या गोष्टींपासून ते परावृत्त होत जातात आणि त्यांची बुद्धी खुजी होण्यास सुरुवात होत जाते.

Web Title: The hand of globalization, or life of a bandit alive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल