दिव्यांग शिक्षक अनुदानापासून वंचित ; विधीमंडळावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:28 AM2017-12-19T00:28:02+5:302017-12-19T00:29:20+5:30
‘अ’ श्रेणीत असलेल्या १२३ शाळा व कर्मशाळांना १०० टक्के अनुदानाचे आदेश निर्गमित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मचारी कृती समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील दिव्यांगाच्या १२३ शाळा व कर्मशाळा शासनाच्या कोणत्याही अनुदानाविना सुरू आहे. सामाजिक न्याय विभागाने ८ एप्रिल २०१५ मध्ये जीआर काढून दिव्यांगाच्या सर्व शाळांना १०० टक्के अनुदान जाहीर केले होते. परंतु आजपर्यंत या जीआरची अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या १५ ते १६ वर्षांपासून दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदान नसल्याने वेतनाविना काम करीत आहे. शासनाने गेल्यावर्षी एक महिन्यात पदमान्यता देणार असे आश्वासन दिले होते. परंतु वर्ष लोटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे दिव्यांग शाळा व कर्मशाळा कर्मचारी कृती समितीतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. १२३ शाळांचे अनुदान द्या, अशी मागणी त्यांनी मोर्चास्थळी रेटून धरली. या मोर्चाचे नेतृत्व जितेंद्र पाटील, मारोती भोयर, अविनाश खिरकेकर, प्रशांत अहिरक र, अविनाश बन्सोड यांनी केले.