हंसराज पारेकरला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:10 AM2021-08-26T04:10:04+5:302021-08-26T04:10:04+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्ह्यामधील खून प्रकरणातील आरोपी हंसराज ईश्वर पारेकर (३६) याला सदोष मनुष्यवधाच्या ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्ह्यामधील खून प्रकरणातील आरोपी हंसराज ईश्वर पारेकर (३६) याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
पारेकर व्यवसायाने वाहन चालक असून, तो घुग्गुस येथील रहिवासी आहे. २१ मार्च २०१८ रोजी सत्र न्यायालयाने पारेकरला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध पारेकरने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला आणि पारेकरला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. इतर शिक्षा कायम ठेवण्यात आली. पांडुरंग राजगाडे असे मृताचे तर, मदन राजगाडे असे जखमीचे नाव आहे. ही घटना १० जुलै २०१६ रोजी घडली होती. पारेकरने शिवीगाळ केल्यामुळे मदन यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पारेकरने रागाच्या भरात मदन व पांडुरंग यांच्यावर चाकूने हल्ला केला.