नागपूर : पोलीस कर्मचाऱ्यांकडून शतप्रतिशत निकाल मिळविण्यासाठी त्यांच्यासोबत भावनिक नाते असणे आवश्यक आहे. जबाबदारी सोपविण्यासह पोलिसांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक काम सोपे होते. जर वरिष्ठ अधिकारी त्यांना रागवत असेल तर तो पालकाचा संदेश समजून निश्चितच स्वीकारतो, असे मत रेंज आयजी डॉ. छेरिंग दोरजे यांनी व्यक्त केले.
भारतीय पोलीस सेवेतील २००० बॅचचे अधिकारी डॉ. दोरजे यांनी ४ सप्टेंबरला आयजी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्याआधी ते आयजी (जेल) पदावर कार्यरत होते. लोकमतशी चर्चा करताना ते म्हणाले, प्रमुखाचे धोरण स्पष्ट असणे आवश्यक आहे. त्याच आधारावर पूर्ण फोर्स काम करतो. शिपाई पोलीस दलाचा कणा आहे. त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्यासाठी भावनिक नाते अत्यंत आवश्यक आहे. असे नाते असल्यास त्यांच्या समस्या व अडचणी समजून कामाचे उत्तम नियोजन करता येऊ शकते. चांगले संबंध राहिल्यास एखादेवेळी त्यांच्याकडून चुकी झाल्यानंतर रागविल्यास ते कर्मचारी त्यांच्या आई-वडिलांचा संदेश समजून स्वीकारही करतात. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच नागरिकांसोबतही त्याच पद्धतीने वागले पाहिजे. तेव्हाच ते मनमोकळेपणाने आपल्या समस्या मांडतील.
डॉ. दोरजे यांनी एमबीबीबीनंतर जनरल सर्जरीमध्ये पदवीत्तर पदवी मिळविली आहे. ते मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. दोरजे यांच्यासोबत त्यांची पत्नी अश्वती दोरजे यांनीही ४ सप्टेंबरला शहर पोलीस दलात सहआयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे. दोघेही स्वच्छ प्रतिमेसाठी राज्यात ओळखले जातात. ते रुजू झाल्यानंतर नागपूर रेंजच्या जिल्ह्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक मोठे अवैध धंदे आपोआप बंद झाले आहेत. डॉ. दोरजे यांचे विदर्भाशी जुने नाते आहे. नक्षल प्रभावित गडचिरोलीमध्ये एएसपी पदावर कार्य करताना त्यांनी अनेक अभियान राबविले आहेत. यासह त्यांनी चंद्रपूर आणि गोंदियात अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्या कारणांनी त्यांना पोलीस आणि नागरिकांच्या समस्यांची जाण आहे.