नागपूर : दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कुही तालुका जलमय झाला आहे. नदी,नाल्यांना पूर आल्याने काठावरील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली. यात शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
माळणी,सावळी, देणी व डोंगरमौदा या गावाजवळील पुलावर नदीचे पाणी आल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. गत दोन दिवसात तालुक्यात अनुक्रमे ७०.२ व ७५.१ मिमी पाऊस कोसळला.
माळणी येथील नाल्यावरील पुलावरून मंगळवारी सकाळी पाणी वाहत असल्याने नागपूर-कुही वाहतूक ठप्प पडली होती. कुही-वडोदा मार्गावरील सावळी गावानजीक असलेल्या नाग नदीच्या पुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच मांढळ-उमरेड मार्गावरील देणी नाला तुडुंब भरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली.
तालुक्यात मुक्कामी राहत असलेल्या बसेस माळणी पुलाला पाणी असल्याने अडून राहिल्या. मुख्य रस्त्याची वाहतूक ठप्प पडल्याने तालुक्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागला. तसेच दूध विक्री करणारे, कंपनीत जाणारे कर्मचारी, मजूर वर्ग, आजारी नागरिकांनाही पुराचा फटका बसला.
आतापर्यंत तालुक्यात १०४१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पेक्षा जास्त पाऊस जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये यंदा झाला आहे. सततच्या पावसामुळे कित्येक घरांची पडझड झाली आहे. याचे पंचनामे तलाठी करीत असून, नुकसानग्रस्तांना मदत मिळणे गरजेचे आहे.
शेतकरी शेतात अडकला
सावळी शिवारात नागनदी काठावरील शेतात ट्रॅक्टर आणायला गेलेला शेतकरी पुराचे पाणी वाढल्याने अडकला. ही घटना सोमवारी सांयकाळी घडली. लाला कोरे (३५) रा. गुमथळा असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आली. रात्री उशिरा या शेतकऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.