राजेश मारोतराव उमरेडकर (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वाठोडा पोलीस ठाण्यासमोरच्या राधाकृष्ण नगरात राहत होता. त्याला एक विवाहित भाऊ असून आई मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस सांगतात. राजेश होतकरू तरुण होता. एका कपड्याच्या दुकानातही तो काम करायचा. त्यातून तो कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी हातभार लावत होता. लॉकडॉऊनमुळे त्याचे काम बंद झाल्याने त्याची आर्थिक कोंडी झाली होती. रविवारी सकाळी त्याचा भाऊ प्रकाश बाहेर गेला. ११.३० ला परत आला तेव्हा राजेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. प्रकाशने पोलिसांना माहिती कळवली. उपनिरीक्षक रमेश ननावरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी राजेशच्या आत्महत्या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आर्थिक कोंडीमुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आजूबाजूला राहणाऱ्यांनी वर्तविला. राजेशची आई मनोरुग्ण आहे. तो स्वतः तिची देखभाल करायचा त्याच्या आत्महत्येमुळे आईसोबत भावाचाही आधार गेला आहे.
---