रामटेक : ३५० फूटाच्या बोरवेलच्या खड्ड्यात एखादा बालक पडला आणि तो वाचला हे सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. मात्र, रामटेकपासून २० कि.मी.अंतरावरील शिवनी (भोंडकी) या गावात बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे घडलय. खड्ड्यात २० फुटावर अडकलेल्या नवधान देना दोंडा या मुलाला गावकºयांनी सुखरुप बाहेरही काढले.
मिळालेल्या माहितीनुसार शिवनी (भोंडकी) येथील एका शेतात काठयावाडींनी डेरा टाकला आहे. या शेतात जवळपास ३५० फूटांची एक बोरवेल आहे. पण पाणी न लागल्याने तीत तशीच ठेवण्यात आली. तीन वर्षीय नवधान देना दोंडा हा इतर मुलासोबत तिथे खेळत होता. खेळता खेळता तो बोरवेलच्या खड्ड्यात पडला. तिथे उपस्थित त्याचे आई-वडील व इतर नातेवाईक धावले. गावातही ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली. ग्राम रक्षक दलाचे कृष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, अक्षय गभणे घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या नातेवाईकांनी बाहेरुन त्याला आवाज दिला. यानंतर आत एक दोर सोडण्यात आला. बोरवेलमध्ये पडला असताना मुलाच्या पायात शुज होते. तो थोडा लठ्ठ असल्याने खड्ड्यात २० फुटावर अडकला. त्याच्या भाषेत आई-वडीलांनी त्याला आवाज दिला त्यानेही प्रतिसाद दिला. त्याने सोडलेला दोर घट्ट पकडला. त्यानंतर त्याला हळूहळू वर ओढण्यात आले. नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला. बाहेर आल्यावर त्याला पाणी पाजण्यात आले. सुदैवाने त्याला कोणतीही जखम झाली नसल्याने उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.