नागपूर : या झाडांनाही जीव आहे, कुऱ्हाड मारली की तेही रडतात. या झाडांवर वेगवेगळ्या रंगाचे चिमुकले पक्षी घरटी बांधून आपल्या पिल्यांसह राहतात. झाडे ताेडली तर या हजाराे निष्पाप जीवांचे संसार उद्ध्वस्त हाेतील. या झाडांमुळेच तुम्हाला ऑक्सिजन, शुद्ध हवा, पाणी मिळते. मग या झाडांची कत्तल का करता. नका ताेडू त्यांना, प्लीज ताेडू नका... अशी भावनिक साद घालत अनेक तरुणांनी अजनी वनातील झाडांना कवटाळले.
अजनी रेल्वे काॅलनी परिसर रविवारी एका ऐतिहासिक आंदाेलनाचे साक्षीदार ठरले. १९७३ साली उत्तराखंडमध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वात शेकडाे आदिवासी महिला, पुरुषांनी जंगल वाचविण्यासाठी केलेल्या चिपकाे आंदाेलनाने जगाचे लक्ष वेधले हाेते. अजनी परिसरातील झाडांवरही आज तसेच संकट आले आहे. म्हणून त्या आंदाेलनाची आठवण देत नागपूरकरांना जागृत करण्यासाठी शेकडाे तरुणांनी रविवारी अजनी परिसरातील झाडांना कवटाळून चिपकाे आंदाेलन केले. जयदीप दास, जाेसेफ जाॅर्ज, अनसूया काळे, श्रीकांत देशपांडे, कुणाल माैर्य अशा पर्यावरणप्रेमींच्या हाकेला ओ देत शेकडाे तरुण सकाळी या ठिकाणी एकत्र आले. येथील १००-१५० वर्षे जुन्या आणि नव्याही झाडांना कवटाळून प्रकल्प राबविणाऱ्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कुणाच्या तरी मेंदूतून इंटरमाॅडेल स्टेशनची कल्पना पुढे येते आणि मागचा-पुढचा काही विचार न करता हजाराे झाडांना कापण्याचा आदेश दिला जाताे, हा कुठला विकास आहे, असा सवाल करीत आंदाेलकांनी राेष व्यक्त केला. अजनी जिंदाबाद, पर्यावरण जिंदाबाद, असे नारे लावत काेणत्याही परिस्थितीत वृक्षताेड हाेऊ न देण्याचा संकल्प येथे घेण्यात आला.
साेशल मीडियावर थेट प्रक्षेपण
आंदाेलनादरम्यान प्रत्येकांनी त्यांच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाऊंटवर आंदाेलन लाईव्ह चालविले. शेकडाे लाेकांकडून या आंदाेलनाला प्रतिसाद मिळत असल्याचे आंदाेलकांनी सांगितले. अनेक लाेक यामध्ये सहभागी हाेण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याचे कुणाल माैर्य या तरुणाने सांगितले. येत्या काळात अजनी वाचविण्याची माेहीम अधिक व्यापक करण्याचा विश्वास त्याने दिला.