न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:44 PM2020-07-28T22:44:36+5:302020-07-28T22:51:41+5:30
सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालय परिसरात ही घटना घडली.
हेमंत वाहणे (वय ५२, रा. पाचपावली) असे जखमी व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयात नादर म्हणून कार्यरत होता. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल काही दिवसांपूर्वी त्याला निलंबित करण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला आज सेवेतून निष्कासित करण्यात आले. त्यामुळे त्याची मानसिक अवस्था बिघडली. या अवस्थेत तो आज दुपारी २.३० च्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत आला. त्याने आरडाओरड करत स्वत:वर ब्लेडने चिरे मारून घेतले आणि भिंतीवर डोके आपटून फोडून घेतले. तो मोठमोठ्याने ओरडू लागला. या घटनेमुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला. सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्याच्याकडे धावले. मात्र तो कुणाला आवरत नव्हता. त्याच्या हातात ब्लेड होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. या प्रकारामुळे तळमाळ्यावर वकिलांनी, पक्षकारांनी एकच गर्दी केली. माहिती कळताच सदर पोलीस तेथे पोहोचले. जखमी वाहणेला मेयो इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी रात्री सदर पोलिस ठाण्यात वाहणेविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.