नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प, सिल्लारी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
आजादी का अमृत महोत्सव या विशेष मोहिमेंतर्गत १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार जंगलग्रस्त तसेच विविध जनजागृतीपर व कर्मचारी क्षमता वृद्धी आणि कल्याण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ही मोहीम दोन वर्षांसाठी राबविण्यात येणार असून, यात ऋतूनुसार प्रत्येक वर्षी ३ शिबिर असे दोन वर्षांसाठी ६ शिबिर घेण्यात येणार आहेत. यात कर्मचाऱ्यांची व सोबत असणाऱ्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या दोन दिवसीय शिबिरात १४० हून अधिक वन कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, उपसंचालक प्रभूनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनात शिबिर झाले.