लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या अवयवदान चळवळीला चांगले दिवस येऊ पाहत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाच्या मंजुरीसाठी नुकतेच आरोग्य विभागाच्या दोन सदस्यीय चमूने पाहणी करून समाधानकारक शेरा दिला आहे. यामुळे लवकरच मंजुरी मिळून शासकीय रुग्णालयात पहिले हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र’ मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आतापर्यंत ६० रुग्णांवर मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे. आता याच्या पुढचे पाऊल म्हणजे, हृदय प्रत्यारोपण. यासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात सीव्हीटीएसचे विभागप्रमुख डॉ. निकुंज पवार हा नवा विभाग उभारण्यासाठी परिश्रम घेत आहेत. आवश्यक पायाभूत सोयी व उपकरणांची खरेदी अंतिम टप्प्यात आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. मित्रा यांनी आरोग्य विभागाला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार आरोग्य विभागाकडून दोन सदस्यीय समितीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी ‘सीव्हीटीएस’ विभागाच्या शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, वॉर्डपासून ते हॉस्पिटलची रक्तपेढी, पॅथालॉजी विभाग, कार्डिओलॉजी विभाग, कॅथलॅब आदींची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांची भेट घेऊन समाधानही व्यक्त केले. समितीचा अहवाल लवकरच आरोग्य विभागाला सादर केला जाणार असून, मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.हृदय प्रत्यारोपणासाठी लागणार निधीहृदय प्रत्यारोपणासाठी गुजरातमध्ये प्रत्येकी रुग्णाला सात लाख तर तामिळनाडूमध्ये १५ लाख रुपये शासकीय तिजोरीतून दिले जाते. महाराष्ट्रात अद्याप तशी सोय नाही. पहिले हृदय प्रत्यारोपण सुरू होणाऱ्या नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही अशाच स्वरूपाच्या निधीची गरज आहे. या निधीशिवाय गरीब व गरजू रुग्णांवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊच शकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी हॉस्पिटलला दीड लाखांचा निधी दिला जातो. त्यामुळेच आतापर्यंत ६० प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे.हार्ट फेल्युअर क्लिनीकमधून मिळणार रुग्णसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी व सीव्हीटीएस विभागाने मिळून ‘हार्ट फेल्युअर क्लिनीक’ सुरू केले आहे. याची माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, या क्लिनीकमध्ये हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येतात. त्यांची गरज लक्षात घेऊनच हृदय प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. एकदा आरोग्य विभागाची मंजुरी मिळाल्यास प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या नोंदणीलाही सुरुवात केली जाईल.आतापर्यंत नऊ हृदय नागपुराबाहेरमध्यभारतातून केवळ नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलला मागील वर्षी हृदय प्रत्यारोपणाला मंजुरी मिळाली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दुसरे हॉस्पिटल ठरणार आहे. विभागीय प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी) उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार २०१३ ते आतापर्यंत ब्रेनडेड व्यक्तीकडून १० वर हृदय मिळाले. यातील एकाच हृदयाचे प्रत्यारोपण न्यू इरा हॉस्पिटलला झाले आहे. त्यापूर्वी नऊ हृदय नागपूरबाहेर पाठविण्यात आले होते.हृदय प्रत्यारोपण केंद्राची गरजहृदय विकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात मधुमेहामुळे याचे गंभीर स्वरुप पहायला मिळत आहे. विशेषत: हार्ट फेल्युअरच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी, हृदय प्रत्यारोपणाच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. सध्या तरी खासगी इस्पितळातच हे प्रत्यारोपण होत आहे. सामान्य व गरीब रुग्णांवरही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. आरोग्य विभागाने मंजुरी दिल्यास व शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यास हृदय प्रत्यारोपण केंद्र सुरू होऊ शकेल.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल