विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांची हाेरपळ
By निशांत वानखेडे | Published: May 5, 2024 10:45 PM2024-05-05T22:45:15+5:302024-05-05T22:45:34+5:30
नागपुरात पहिल्यांदा पारा ४३ वर : अकाेला, चंद्रपूर, वर्धा ४४ पार.
नागपूर : मे महिन्याचा पहिला आठवडा विदर्भवासियांसाठी अत्यंत ‘ताप’दायक ठरला आहे. एप्रिलमध्ये काहीसा दिलासा देणारा सूर्य मे मध्ये आग ओकत आहे. सर्वाधिक ४४.४ अंशाची नाेंद झालेल्या अकाेल्यानंतर चंद्रपूर, वर्धा शहरातही पारा ४४ पार गेला. यावर्षी नागपूरचा पारा पहिल्यांदा ४३ अंशावर पाेहचला आहे. नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असून रविवारी अक्षरश: अंगाची हाेरपळ हाेत असल्याचा अनुभव लाेकांना आला.
अवकाळीचे सावट हटताच मे च्या पहिल्या दिवसापासून सूर्याची प्रखरता जाणवायला लागली आहे. विदर्भाचे तापमान आता नेहमीच्या स्थितीत पाेहचले आहे. बुलढाणा ३९.६ आणि ४१.३ अंशावरील गाेंदिया वगळता सर्व जिल्हयात उन चांगलेच तडकले आहे. गेल्या वर्षी तापमानामुळे जागतिक क्रमवारीत असलेले अकाेला व चंद्रपूर यंदाही सूर्याच्या ज्वाळांनी भाजले आहे. चंद्रपूरला रविवारी ४४.२ अंशाची तर वर्ध्यात ४४ अंशाची नाेंद झाली. दुसरीकडे सर्वाधिक जंगल असलेल्या गडचिराेलीतील नागरिक ४३.८ अंशाचे चटके सहन करीत आहेत.
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार साेमवारी ६ मेपासून विदर्भाच्या आकाशावर ढगांचे सावट पसरणार असले तरी एक दिवस उष्ण लाटेचाही सामना करावा लागणार आहे. तापमानाची स्थिती रविवारीप्रमाणे साेमवारी कायम राहिल, अशी शक्यता आहे.
अवकाळीचे सावट पुन्हा
हवामान खात्याने विदर्भात पुन्हा अवकाळीचा अंदाज वर्तविला आहे. साेमवारपासून ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, वादळ व तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अवकाळीचे वातावरण पुढे पाच दिवस ११ मे पर्यंत राहिल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.