ठळक मुद्देमौदा तालुक्यात २३९.७ मि.मि.पावसाची नोंदसूर, सांड नदीला पूर, एसडीआरएफचे मदतकार्यजवानांनी अनेकांना सुखरूप काढलेपेंच कालव्यात बाबदेवजवळ भगदाड पडलेजनता विद्यालयात २१ विद्यार्थ्यांना फटकापारशिवनीत एक जण वाहून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा सर्वाधिक फटका मौदा तालुक्याला बसला आहे. सूर आणि सांड नदीच्या पुराने तालुक्यात थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तारसा, बाबदेव, कोराड, धामणगाव, कुंभारी, बोरगाव परिसरात सांड नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. पुरामुळे धान, सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.कुंभारी-धामणगाव परिसरात एनटीपीसीच्या तलावाजवळ ६ मजूर पुरात अडकल्याचे निदर्शनास येताच मौद्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार दिनेश निंबाळकर यांनी एसडीआरएफच्या चमूला पाचारण केले. चमूने तात्काळ कारवाई करीत पुरात अडलेले बाबूलाल सिंग, संपत सिंग, अंबेलाल सिंग, छोटेलाल सिंग, रामलखन सिंग (रा.एन.टी.पी.सी.कॉलनी) आणि अंजीराम मेश्राम (रा.विरशी) यांना सुखरूप बाहेर काढले. याच चमूने संजय गोविंदराव वानखेडे रा.कोराड यांच्या मालकीची चार जनावरे दोर सोडून मुक्त केली. मात्र महालगाव येथील बाबू उके यांच्या गाईचे वासरु पुरात वाहून गेले.पेंच प्रकल्पाच्या कालव्याला बाबदेव परिसरात भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले. पावसाचे पाणी आणि पेंच प्रकल्पातील पाणी एकत्र आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पारशिवनी तालुक्यात आमडी नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला. सुरेश सदाशिव सातपैसे (४२) असे या व्यक्तीचे नाव असून प्रशासनाच्यावतीने शोधकार्य सुरू आहे.शिवाडौली,सावंगी व भांडेवाडी येथील २० घरांमधे दोन ते तीन फुटावर पाणी जमा झाले,यात मोठे आर्थिक नुकसान झाले. रामटेक तालुक्यातील नगरधन विभागात २४५.४ मि.मी व मुसेवाडी विभागात १५६.२ मि.मि. पावसाची नोंद झाली. या परिसरात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.असा पडला पाऊसतालुक्यातील मौदा, धानला, निमखेडा, चाचेर, खात व कोदामेंढी मंडळात अनुक्रमे २६२.८, १७६.२, २९१.०,२८०.८,२५४.४ व १८२.२ अशी एकूण २३९.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.वाहतुकीला फटकाअतिवृष्टी व पुरामुळे १) तारासा-अरोली मार्ग, २) लापका-धामणगाव-आजनगाव-मांगली (तेली) मार्ग, ३) चिचोली-दहेगाव-खात मार्ग ४) तांडा-सिरसोली-पिंपळगाव ५) बोरगाव-मोहाडी-गोवरी मार्ग ६) भोवरी-चिखलाबोडी ७) पार्डी(कला) राजोली-नांदगाव मार्गावरील बंद पडले होते.२९७ लोकांना सुरक्षित स्थळी हलविलेपुराचा फटका बसलेल्या २९७ लोकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यात बाबदेव येथील ४५, नेरला-१६, तारसा-३५, धानला-५०, बोरगाव-२५, दहेगाव-५, कोराड - ५, गोवरी - २५, निमखेडा-५, मोहाडी-२५, इजनी-१५, वाकेश्वर-८, आष्टी बारशी-१४, अरोली-४ व नरसाळा येथील २० अशा २९७ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.विद्यार्थी शाळेत अडकलेसांड नदीला आलेल्या पुरामुळे मांगली (तेली) सुंदरगाव येथे राहणारे जनता विद्यालयाचे २१ विद्यार्थी घरी पोहचू शकले नाही. याबाबतची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळताच त्यांनी भाजपचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर सोरते, नगरपंचायतचे गटनेता राजू सोमनाथे यांच्या मार्फत विद्यार्थी व प्रवाशांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करून दिली.सूर नदीच्या पुलावर पाणीकोदामेंढी मंडळात १८२.०२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात सूर नदीलाही पूर आला. नदीच्या पुलावरून तीन फूट वर पाणी वाहत होते. संरक्षण कठड्यात पुरात वाहून आलेला कचरा लटकल्याने गावात पाण्याची पातळी वाढली होती. मात्र गावकऱ्यांनी, ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सकाळीच सफाई अभियान राबविले त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली.तारशात २०१५ ची पुनरावृत्तीतारसा शिवारा झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातून वाहणाऱ्या सांड नदीच्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे सोमवारच्या रात्री तारसा गावात नदीचे पाणी शिरले. गावातील ३५ पेक्षा जास्त घरात पाणी शिरले तर १० हून अधिक घरांची पडझड आली. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांची राहण्याची व्यवस्था गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली होती. नदीच्या पुरामुळे परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कारल्याची बाग उद्ध्वस्ततारसा निमखेडा रोडवर असलेली कारल्याची बाग सोमवारपासून सुरू असलेल्या पावसाने उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेचिचाळ्यात घर पडलेचिचाळा परिसरात संततधार पाऊस चालू आहे. सतत दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे चिचाळा येथील मारोती तुळशीराम अरतपायरे यांचे घर पडले. अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेले मारोती अरतपायरे यांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ घरकुल यादीत सहभागी करून घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तलाठी तिजारे, कोतवाल बंडू कांडारकर यांनी मोक्काचौकशी करून शासनातर्फे मदत मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.