नागपूर जिल्ह्यात यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता पुराची धास्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:18 AM2021-06-09T10:18:50+5:302021-06-09T10:19:52+5:30
Nagpur News यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य अतिवृष्टी गृहित धरून प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. पथकांची निश्चिती केली असून, मान्सूनपूर्व आढावा बैठकीतून सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य अतिवृष्टी गृहित धरून प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. पथकांची निश्चिती केली असून, मान्सूनपूर्व आढावा बैठकीतून सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
संभाव्य पूरग्रस्त गावांची यादी तयार केली असून मार्ग, निवाऱ्यासाठी शाळांच्या इमारती निश्चित केल्या आहेत. नाल्यावरील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोर्ड लावण्यात आले आहेत. सिंचन विभागाकडून सर्व प्रकल्पांचे ऑडिट केले आहे. पूर परिस्थितीच्या काळात मदतीसाठी साहित्याची जुळवाजुळव झाली आहे. एनडीआरएन, आर्मी टीम, मनपाचे बचाव पथक या सर्वांचा समन्वय राखण्यात आला आहे.
कंट्रोल रूम स्थापन करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची यासाठी संपूर्ण मदत घेतली जाणार आहे.
प्रशासनाची काय तयारी?
फायर फायटर - नाही (मनपाकडे आहे)
रेस्क्यू व्हॅन - नाही (मनपाकडे आहे)
फायबर बोटी - २२
लाईफ जॅकेट - २००
कटर - १५
जिल्ह्यातील नद्या : ८
नद्याशेजारील गावे : ३४०
पूरबाधित होणारे तालुके : ६
...
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान : १,००७ मिमी
अग्निशमन दल सज्ज
महानगरपालिकेचे अग्निशमन दल सज्ज आहे. वाहन, फायर फायटर, रेस्क्यू व्हॅन तसेच उंच उमारतीमध्ये अडकून पडलेल्यांना सुखरूप वाचविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाही महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. वर्षभरापूर्वीच ती मनपाच्या सेवेत दाखल झाली असून, तिचे प्रात्यक्षिकही यशस्वी झाले आहे.
पूरबाधित क्षेत्र
जिल्ह्यातील तीन तालुके पुराच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहेत. तसेच मौदा, पारशिवनी, कामठी, कुही, भिवापूर या तालुक्यांसोबत सावनेर तालुक्यातील काही गावांचीही यादृष्टीने संवेदनशील यादीत नोंद आहे. जिल्ह्यातील ३४० गावे नदीच्या काठावर आहेत. त्यातील १२० गावे शहरी वस्तीचा भाग आहेत. या ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवल्यास निवारा म्हणून शाळांच्या इमारती निश्चित केल्या आहेत. पूर परिस्थितीच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरात १४० धोकादायक इमारती
नागपूर शहरात अलीकडेच करण्यात आलेल्या पाहणीमध्ये १४० इमारती धोकादायक असल्याचे आढळून आल्या. त्या निर्लेखित करण्यासाठी संबंधित मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही इमारतींसंदर्भात मनपा स्वत: पुढाकार घेऊन पाडण्याची कारवाई करीत आहे. शहरात धोकादायक झाडे कमी असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.
संभाव्य पूरग्रस्त गावांची निश्चिती केली असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी नियोजन केले आहे. तालुकास्तरावर मॉक ड्रील घेऊन धडे दिले जात आहेत. बचावकार्याच्या दृष्टीने चार चमू सज्ज आहेत. संपर्कासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे.
- अंकुश गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नागपूर
...