नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था : दोन हजार पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:55 PM2019-08-14T22:55:10+5:302019-08-14T22:56:48+5:30
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
काश्मीर येथील कलम ३७० हटविल्यानंतर दहशतवादी संघटनेतर्फे देशातील प्रमुख शहरांमध्ये घातपात घडविण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुप्तचर संस्थांनी पोलीस आणि सेनेला सतर्क केले आहे. देशातील सर्व प्रमुख शहरे आणि विमानतळांना ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. नागपूर शहराचे महत्त्व अलीकडे प्रचंड वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासह शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसाना तैनात करण्यात आले आहे. बाजारांमधील निगराणी वाढवण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण इमारतींवरही पोलीस पथक तैनात करण्यात आले आहेत. संदिग्ध हालचालींवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातही पोलीस तैनात राहतील. बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बारीक नजर ठेवण्याचे निर्देश बजावण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलीस तैनात राहतील. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. कुठलीही संशयास्पद हालचाल किंवा संदिग्ध वस्तू आढळून आल्यास पोलिसांना सूचित करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.
स्कूल बस-व्हॅन सुरू ठेवा
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्कूल बस व व्हॅन सुरू ठेवाव्या असे आवाहन वाहतूक विभागाने स्कूल संचालकांना केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध शाळांमध्ये ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्कूल व्हॅन किंवा बस बंद राहिल्यास पालकांना त्रास सहन करावा लागू शकतो. तेव्हा पालकांना होणारा त्रास लक्षात घेता वाहन चालक-मालकांनी त्यांना सहकार्य करीत स्वातंत्र्यदिन साजरा करावा.