आशीष रॉय
नागपूर : कारगील युद्धाबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व तत्कालीत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सेवेत असलेले भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आता फुटाळ्याचे सौंदर्य वाढविणार आहे. हे हेलिकॉप्टर फुटाळा परिसरात नागरिकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. हे हेलिकॉप्टर वायुसेनानगर एअर फोर्स स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. महामेट्रोने एअरफोर्सकडून हेलिकॉप्टर घेऊन बुधवारी फुटाळ्यात माऊंट केले. त्यासाठी महामेट्रोने येथे ८ फूट उंच प्लॅटफॉर्म बनविला आहे, ज्यावर हेलिकॉप्टर माऊंट करण्यात येणार आहे.
एमआयएल एमआय-८ हेलिकॉप्टर हे तत्कालीन सोवियत युनियनने १९८० मध्ये बनविले होते. २०२० पर्यंत ते सेवेत होते. या हेलिकॉप्टरमध्ये ४ टन माल वहन करण्याची क्षमता आहे. वायुसेनेने या हेलिकॉप्टरला व्हीआयपी सलूनमध्ये परिवर्तित केले व यात वॉशरूमदेखील बनविले. याच्या मल्टिलोड मशीनमध्ये ५ ब्लेड आहेत. वायुसेनेने दोन हेलिकॉप्टर दान दिले आहेत. एक चंदीगड येथे आहे. जगातले हे सर्वाधिक महत्त्वाचे हेलिकॉप्टर आहे, ज्याचा उपयोग ५० हून अधिक देशांनी केला आहे.
या हेलिकॉप्टरची पहिली प्रतिकृती १९५८ मध्ये डिझाईन केली होती. हेलिकॉप्टरने पहिली उड्डाण १९६१ मध्ये भरली होती. १९६३ मध्ये फॅक्टरी बेस्ट टेस्टिंग पूर्ण केली होती. याची चौथी प्रतिकृती व्हीआयपी ट्रान्सपोर्टसाठी डिझाईन केली आहे. १९६३ मध्ये हेलिकॉप्टरच्या रोटला चार ऐवजी पाच ब्लेड लावण्यात आले होते. कॉकपिटच्या दरवाजाला ब्लिटर पर्सपेक्स स्लाईड्समध्ये बदलण्यात आले होते. केबीनमध्ये स्लाईडिंग डोअर लावण्यात आले होते. याची पाचवी प्रतिकृती पॅसेंजर मार्केटसाठी होती. १९६४ मध्ये संपूर्ण चाचण्या करून सोवियत सरकारने याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले होते. याचे उत्पादन कजान प्रोडक्शन प्लांटमध्ये सुरू झाले. १९६५ मध्ये पहिले एअरक्राफ्ट बनले. आजही रशियात याचे उत्पादन होत आहे.