लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रविवारी रात्री चंद्राभोवती पडलेला अंगठीसारखा घेरा नागपूर जिल्हा, भंडारा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला. चंद्राभोवती पांढऱ्या रंगाचा घेरा तयार झाल्यासारखे वर्तुळात दिसत होते. हे वर्तुळ तो चंद्रासमवेत फिरत असल्याचे दिसत होते. ते पाहिल्यावर लोकांनी त्यांचे मित्र व नातेवाईकांना फोन करायला सुरवात केली. बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले. काही लोक भविष्यातील वाईट काळातील सूचक म्हणून त्याचा विचार करीत होते, तर काही ठिकाणी करोनावर मात करुन विजय संपादित करणाऱ्या काळाचे भाकित असल्याचे चर्चिले जात होते. काही लोक ग्लोबल वार्मिंगचा परिणाम असल्याचे बोलत होते.'हॅलो ऑफ मून' ही नवीन बाब नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे जी सहसा थंडीपासून उष्णतेच्या संक्रमणादरम्यान उद्भवते. भारतात हे फारच कमी घडते, ही घटना बर्फाळ देशांमध्ये अधिक दिसून येते. हे सहसा सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात दिसून येते. यावेळी, चंद्राभोवती एक गोलाकार वर्तुळ तयार होते, त्याला 'हॅलो ऑफ मून' म्हणतात. वास्तविक, आकाशात ढगांमध्ये बऱ्यापैकी बर्फाचे कण चंद्राच्या प्रकाशाशी अनेकदा भिडतात, ज्यामुळे प्रकाशाची प्रतिमा निर्माण होते आणि चंद्राभोवती अंगठी सारखा आकार दिसतो. ही आकृती काही तासांपासून ते 7-8 दिवसांपर्यंत दृश्यमान असू शकते.हवामानशास्त्रानुसार ही एक सामान्य खगोलीय घटना आहे आणि त्याबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही. काही लोक मून रिंग किंवा विंटर हॅलो व्यतिरिक्त त्याला निंबस किंवा आईस्बो म्हणतात. काहीवेळा तो सूर्याभोवतीदेखील घेरतो आणि अशा स्थितीत त्याला सौर हॅलो असे सुद्धा म्हणतात.
आकाशात दिसला 'हॅलो ऑफ मून'; नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 7:57 AM