टॅक्सी चालक-मालकांना पीएम केअर फंडामधून मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:30 AM2020-08-08T01:30:28+5:302020-08-08T01:32:10+5:30
कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतेकांचे व्यवसाय प्रभावित झाले. यातून टॅक्सीचालकही सुटलेले नाहीत. गेल्या साडेचार महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतेकांचे व्यवसाय प्रभावित झाले. यातून टॅक्सीचालकही सुटलेले नाहीत. गेल्या साडेचार महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. या दयनीय परिस्थितीतून काढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधी (पीएम केअर फंड) मधून प्रत्येकी ३० हजार रुपये आर्थिक सहकार्य व विम्याचे संरक्षण देण्याची मागणी विदर्भ टॅक्सीचालक-मालक संयुक्त कृती समितीतर्फे करण्यात येत आहे.
संघटनेतर्फे याबाबत पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय वित्त मंत्रालय व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. याबाबत संघटनेतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली. या काळात खासगी टॅक्सीचालक, ऑटोचालक, स्कूल व्हॅनचालक यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला असून अत्यंत दयनीय परिस्थितीत कुटुंबाला सांभाळणे कठीण झाले आहे. असे असूनही पीएम केअर फंडमधून काहीही मिळाले नाही. न्यायालयानेही मदत मिळायला हवी ही बाब मान्य केली पण हा सर्वस्वी अधिकार पीएम केअर ट्रस्टचा असल्याचे नमूद केले. त्यामुळे परिस्थिती समजून टॅक्सीचालकांना मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. मार्च महिन्यात टॅक्सीचालकांनी रोड टॅक्स, परमीट, फिटनेस पासिंग, इशुरन्स भरले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता पुन्हा असे कर भरणे टॅक्सीचालकांना शक्य नाही. त्यामुळे हे कर भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्याची मागणीही संघटनेतर्फे दीपक साने, प्रवीण नर्डेलवार, कर्णवीर कोल्हे, अशोक मेंढे, अनिल साहू यांनी केली आहे.