औषधांच्या तुटवड्याने रुग्ण धोक्यात : नागपुरातच व्हावे ‘अॅन्टी हिमोफिलिक फॅक्टर’नागपूर : नागपूर जिल्ह्यात हिमोफिलियाचे निदान न झालेले १० हजार रुग्ण आहेत. यातील दरवर्षी चार-पाच जणांचा मृत्यू होतो. या आजाराचे रुग्ण वाचविण्यासाठी ‘अॅन्टी हिमोफिलिक फॅक्टर’ औषधे महत्त्वाचे ठरते. परंतु राज्यात केवळ ठाणे, अमरावती, नाशीक, कोल्हापूर, केईएम रुग्णालय मुंबई आणि ससून रुग्णालय पुणे येथील केंद्रावरच हे नि:शुल्क औषधे मिळते. यातच गेल्या तीन वर्षांपासून औषधांचा तुटवडा पडल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मेडिकल, किंवा मेयो किंवा डागा रुग्णालयात ही सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरीत आहे. हिमोफिलिया हा एक आनुवंशिक आजार आहे. या आजार झालेल्या रु ग्णाच्या रक्तात ‘थ्रोम्बोप्ला स्टोन’ नावाच्या घटकाची निर्मिती होत नाही. जखम झाली की रक्त येते. ते रक्त काही क्षणात थांबते, कारण हा आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तात ‘थ्रोम्बोप्लास्टिन’ नावाच्या घटकाची निर्मिती होते. पण ज्याच्या रक्तामध्ये ‘थ्रोम्बोप्लास्टिन’ हा रक्तातला घटक निर्माण होत नाही, त्या व्यक्तीला जर जखम झाली तर रक्तस्राव थांबत नाही. परिणामी शरीरातले रक्ताचे प्रमाण वेगाने घटू लागते. त्यावेळी योग्य ते औषध मिळाले नाही तर रु ग्ण दगावू शकतो. काही रु ग्णांमध्ये शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला तर मात्र परिस्थिती अधिक गंभीर होते. अशा व्याधीग्रस्ताला दर आठ तासांनी रक्त द्यावे लागते.तज्ज्ञाच्या मते, १० हजार रुग्णांच्या मागे एक हिमोफिलियाचा रुग्ण आढळून येतो. सद्यस्थितीत नागपुरात हिमोफिलियाचे साधारण ४२४ रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, शहर व जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार केल्यास नोंद झालेल्या कितीतरी पट जास्त रुग्ण असे आहेत ज्यांचे निदानच झालेले नाही. या व्याधीवर असलेली औषधे अत्यंत महाग आहेत. ते नि:शुल्क अथवा अल्प दरात व्याधीग्रस्तांना उपलब्ध व्हावीत म्हणून हिमोफिलिया सोसायटीने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. या व्याधीने ग्रस्त असलेल्या एकाचा वार्षिक खर्च सुमारे एक लाख आहे. एका व्याधीग्रस्ताला किती युनिट औषध द्यायचे ते संबंधित व्याधीग्रस्तांच्या वजनावर आणि होणाऱ्या रक्तस्रावावर अवलंबून आहे. नागपूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि त्या तुलनेत रुग्णांची संख्या पाहता या विषयी जनजागृती आणि नि:शुल्क ‘अॅन्टी हिमोफिलिक फॅक्टर’ मिळणे आवश्यक झाले आहे.(प्रतिनिधी)
हिमोफिलिया रुग्णांची अमरावतीवारी
By admin | Published: April 18, 2017 2:09 AM