अहो हे, बसस्थानक की दुचाकींचे वाहनतळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:29 PM2018-02-07T22:29:32+5:302018-02-07T22:32:37+5:30
जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी जिथे जागा मिळेल, तिथे वाहन उभे करून त्यांना बाहेरगावी जावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी जिथे जागा मिळेल, तिथे वाहन उभे करून त्यांना बाहेरगावी जावे लागते. परत आल्यावर मात्र ते वाहन सुस्थितीत असेलच याची खात्री नसते. जिल्ह्यातील कळमेश्वर, रामटेक, सावनेर, उमरेड, कामठी, पारशिवनी, नरखेडच नव्हे तर सर्वच बसस्थानकात अशीच स्थिती आहे. याकडे एसटी महामंडळ कधी लक्ष देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
कळमेश्वर बसस्थानक परिसरात दिवसभर मोटरसायकलसह कारचे अवैधपणे पार्किंग केले जाते. ही वाहने मिळेल तिथे लावली जात असल्याने बसचालकांनाही बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. येथे पार्किंगचे कंत्राट एखाद्याला दिल्यास वाहने सुस्थितीत असू शकतात. सोबतच त्या कंत्राटामुळे एसटी महामंडळालाही आर्थिक हातभार लागू शकतो. कळमेश्वर येथून दररोज नागपूर, काटोल, नरखेड, सावनेर येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोच्या घरात आहे. सोबतच विद्यार्थीही बाहेरगावी शिकायला जातात. त्या सर्वांची वाहने बसस्थानक आवारात बेवारस असतात. ही वाहने चोरी जाण्याचीही शक्यता अधिक असते. याकडे एसटी महामंडळानेच लक्ष देण्याची गरज आहे.
असेच चित्र रामटेक बसस्थानक येथेही आहे. येथून दररोज नागपूर, कामठी, कन्हान, देवलापार, भंडारा, पारशिवनी, मौदा, तुमसर येथे प्रवासी ये-जा करतात. त्या सर्वांची वाहने बसस्थानकाच्या आवारात अस्ताव्यस्त असतात. एवढेच काय तर आजूबाजूच्या गावातील नागरिकांना रामटेक येथून बाहेरगावी जायचे असल्यास ते आपली दुचाकी रामटेक बसस्थानक परिसरात ठेवतात. सायंकाळी परत आल्यावर आपल्या वाहनाने गावाकडे जातात. परिणामी अवैधपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या रामटेक येथे अधिक आहे.
पार्किंगसाठी ओळखीचा आधार
बसस्थानकावर वाहनांचे पार्किंग स्टॅन्ड नसल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होते. त्यामुळे जागा मिळेल तिथे वाहन उभे करून नागरिक पुढच्या प्रवासाला निघतात. काही जण आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे वाहन पार्क करतात. एवढेच काय तर बसस्थानकापुढे असलेल्या पानटपरी, दुकानदाराशीही ओळखी वाढविली जाऊन त्याच्या दुकानासमोर अशी वाहने उभी असतात. मात्र परत येईपर्यंत ते वाहन सुस्थितीत असेलच याची खात्री नसते.