नागपूरच्या संस्कृत विद्यापीठाचे ‘हायटेक’ पाऊल, ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:32 PM2017-12-04T22:32:59+5:302017-12-04T22:35:07+5:30
राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठानेदेखील तंत्रज्ञानाची कास पकडली आहे. परीक्षेच्या निकालांना गती मिळावी व पारदर्शकता वाढावी, यासाठी संस्कृत विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर : राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठानेदेखील तंत्रज्ञानाची कास पकडली आहे. परीक्षेच्या निकालांना गती मिळावी व पारदर्शकता वाढावी, यासाठी संस्कृत विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे. विद्यापीठात परीक्षांची संख्या फारशी नसली तरी या प्रणालीमुळे एक नवी सुरुवात झाली आहे, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली आहे.
मागील वर्षी संस्कृत विद्यापीठ ‘नॅक’च्या मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे गेले होते. मूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्यातच बी++ श्रेणी बहाल करण्यात आली होती. या श्रेणीत आणखी सुधारणा व्हावी यासाठी विद्यापीठाकडून विविध सुधारणांवर भर देण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठाने ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाची प्रणाली यशस्वीपणे राबविली व त्यामुळे राज्यात सर्वात अगोदर निकाल देणारे विद्यापीठ बनले. संस्कृत विद्यापीठातदेखील ही प्रणाली सुरू करावी, असा प्रस्ताव होता. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सविस्तर चर्चादेखील झाली होती व परिषदेची मंजूरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली.
संस्कृत विद्यापीठात फारशा परीक्षा नाहीत व साधारणत: पाच हजार विद्यार्थी परीक्षेला बसतात. यातील काही परीक्षांना ५०० हून अधिक विद्यार्थी असतात. सद्यस्थितीत सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनस्क्रीन’ होत नसून केवळ जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्यांचेच मूल्यांकन या पद्धतीने होत आहे. याचा भविष्यात विस्तार करण्यात येईल. या प्रणालीमुळे पारदर्शकता आणि मूल्यांकनातील सुटसुटीतपणादेखील वाढेल, असे डॉ.येवले यांनी सांगितले.