नागपूर : सोनेगाव पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या पन्नासे ले-आऊट व वहाणे ले-आऊट या परिसरात गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी हैदोस घातला आहे. यामुळे लोक आधीच घाबरले असून चोरटे चोरी केल्यानंतर लिंबू कापून फेकत असल्याने दहशत पसरली आहे.
पन्नासे ले-आऊट आणि वहाणे ले-आऊट या दोन्ही सोसायट्या लागून आहेत. मागील एक महिन्यांपासून या दोन्ही सोसायटीमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच येथे राहणारे एक गोडावून व्यापारी परिवारासह गोव्याला गेले होते. त्यांच्या मागे त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० लाखाचे दागिने चोरून नेले. परवाच एका घरी अडीच लाखाची चोरी झाली. महिनाभरात तीन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोचा माल लंपास केला. तसेच तीन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो अपयशी ठरला. चोरटे केवळ चोरी करीत नाहीत तर ते चोरी केल्यानंतर तिथे लिंबू कापून फेकताहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
बॉक्स
पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये असंताेष
महिनाभरापासून या परिसरात चोऱ्या होत आहेत. परिसरात काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्याच माध्यमाून चोरांपर्यंत पोहोचता येऊ शकते. यासंदर्भात येथील नागरिकांनी अनेकदा पोलिसांना निवेदन सादर केले. परंतु पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहे. निवेदनाला साधे उत्तरही दिले जात नाही. फोन केला तर कुणी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे येथील नागरिक संतापले असून सोनेगाव पोलिसांविरुद्ध असंतोष पसरला आहे. चोरट्यांना पोलिसांचाच आशीर्वाद तर नाही ना. असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.