लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेकॉर्डवरील पुराव्यावरून पत्नीची क्रूरता सिद्ध न झाल्यामुळे पतीला मिळालेला घटस्फोट रद्द केला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला.
नागपूर येथील दाम्पत्य वंदना व रवी (बदललेली नावे) यांचे १९ डिसेंबर २०१० रोजी लग्न झाले. रवीचे हे दुसरे लग्न असून, त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. कुटुंब न्यायालयाने रवीला वंदनाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट दिला होता. त्याविरुद्ध वंदनाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून, कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. वंदना घरातील कामे करीत नाही. वारंवार माहेरी जाते. मुलींना विनाकारण मारहाण करते. मानहानीजनक शिवीगाळ करते. वयोवृद्ध आईला भोजन देत नाही. अनेकांनी समजावूनही तिच्या वागणुकीत बदल झाला नाही. ती आत्महत्या करण्याची धमकी देते, असे रवीचे म्हणणे होते. परंतु, हे आरोप उच्च न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही.
पाच हजार रुपये पोटगी
कुटुंब न्यायालयाने वंदनाला १५०० रुपये महिना पोटगी दिली होती. उच्च न्यायालयाने वर्तमान महागाईचा विचार करता पोटगी वाढवून ५ हजार रुपये महिना केली. तसेच, ही पोटगी १३ एप्रिल २०१२ पासून अदा करण्यात यावी, असा आदेशही रवीला दिला.