लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात नेते, मेंढे, भारतीय निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांनी नेते तर, कारू नान्हे यांनी मेंढे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे या दोन्ही खासदारांची निवडणूक रद्द करून दोन्ही मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. निहालसिंग राठोड तर, निवडणूक आयोगातर्फे अॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.