हायकोर्ट : अविनाश भुते यांच्यावरील आरोपांचा तक्ता सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:37 AM2019-07-26T00:37:45+5:302019-07-26T00:39:23+5:30
वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांच्यावरील आरोपांचा तक्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी तो तक्ता रेकॉर्डवर घेऊन संबंधित प्रकरणावर पुढील कार्यवाहीसाठी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांच्यावरील आरोपांचा तक्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी तो तक्ता रेकॉर्डवर घेऊन संबंधित प्रकरणावर पुढील कार्यवाहीसाठी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
विशेष सत्र न्यायालयाने वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, व्यापाऱ्याने विश्वासघात करणे, धमकी देणे इत्यादी दोषारोप निश्चित केले आहेत. यापैकी व्यापाऱ्याने विश्वासघात करण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. आरोपी अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर, मिथिला विनय वासनकर व अविनाश भुते यांनी या दोषारोपांविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.
कंपनीने ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने व ४८ महिने मुदतीच्या वेगवेगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर मुदत संपूनही ठेवी व त्यावरील परतावा अदा करण्यात आला नाही. परिणामी, गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर झालेल्या तपासामध्ये आरोपींचे पितळ उघडे पडले. आरोपी गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करून गुंतवणूकदारांना जाळ्यात फसवित होते. कंपनीने नेमलेले एजन्टस् राज्यभर फिरून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होते. न्यायालयात भुतेतर्फे अॅड. देवेंद्र चव्हाण तर, सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.