लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्याच्या प्रकरणातील दोषसिद्धीवर स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
या अर्जावर मंगळवारी न्या. विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने सरकारला १ नोव्हेंबरपर्यंत अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. गेल्या गुरुवारी न्यायालयाने ठाकूर व इतर तीन आरोपींच्या शिक्षेला स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला होता. आता ठाकूर यांना भादंवि कलम ३५३, ३३२ व १८६ या दोषांवर स्थगिती हवी आहे.
या प्रकरणामुळे स्वच्छ राजकीय व सामाजिक प्रतिमेवर वाईट परिणाम होत आहे. विरोधक या प्रकरणाचा गैरफायदा घेत आहेत. परिणामी या दोषसिद्धीवर स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाकूर यांनी न्यायालयाला केली आहे.
सदर गुन्ह्यात अमरावती सत्र न्यायालयाने गेल्या १५ ऑक्टोबर रोजी ठाकूर यांना तीन महिने कारावास व १० हजार रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध ठाकूर यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यात सदर अर्ज सादर करण्यात आला आहे. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. ठाकूर यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, ॲड. अनिकेत निकम व ॲड. कुलदीप महल्ले यांनी कामकाज पाहिले.