नागपूर : कोरोना संकटाच्या वेळी आलेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे लॅपटॉप किंवा मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीसोबत तो काम करायचा. अनेक राज्यात त्याने गुन्हे केले होते. तमिळ सेलवान कन्नन (२५, तिरुवरू, तमिळनाडू) असे आरोपीचे नाव आहे.
कन्ननने अर्थशास्त्रात बीए केले आहे. कोविड संक्रमण सुरू झाल्यानंतर तो आर्थिक अडचणीत सापडला. त्यावेळी सरकारी रुग्णालये रुग्णांनी भरलेली होती. सरकारी रुग्णालयातील घोर निष्काळजीपणा पाहून कन्ननने तेथून डॉक्टरांचे लॅपटॉप किंवा मोबाईल चोरण्यास सुरुवात केली. तो हॉस्पिटल आणि होस्टेलजवळ घिरट्या घालायचा व संधी मिळताच चोरी करायचा. त्याने दिल्ली, म्हैसूर, बंगळुरू, चेन्नईसह अनेक मोठ्या शहरांत चोऱ्या केल्या. दिल्लीत जुने लॅपटॉप आणि मोबाईल खरेदी-विक्रीचा बाजार आहे. कन्नन तेथे जाऊन लॅपटॉप आणि मोबाईल विकायचा. हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू होता.
गेल्या आठवड्यात त्याने दिल्लीतील एम्समधील दोन डॉक्टरांचे लॅपटॉप चोरले. त्यांची विक्री करून तो दिल्लीहून चेन्नईला गेला. तेथून बुधवारी सकाळी तो नागपुरात परतला. कन्नन बुधवारी संध्याकाळी मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील बॉईज होस्टेलमध्ये पोहोचला. चौकीदाराला तो बाहेरचा माणूस असल्याचा संशय आला. त्याने कन्ननला पकडले. घटनेची माहिती मिळताच नाईक हवालदार आनंद गांजुर्ले यांनी घटनास्थळ गाठून कन्ननला ताब्यात घेतले. कन्ननच्या टोळीत प्रभास नावाच्या तरुणासह तीन-चार सदस्य आहेत. ते वेगवेगळ्या शहरात फिरून चोऱ्या करतात. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कन्ननला पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.