नागपुरातील रॅडिसन ब्ल्यूमध्ये सापडले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:18 AM2019-01-08T00:18:34+5:302019-01-08T00:20:01+5:30
वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसनमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून गुन्हे शाखेच्या पथकाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोलकाता येथील एका तरुणीला पकडले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलाल महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे हॉटेलमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसनमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून गुन्हे शाखेच्या पथकाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोलकाता येथील एका तरुणीला पकडले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलाल महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे हॉटेलमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
माया पूजाराव नावाची महिला दलाल शहरात आंतरराष्ट्रीय हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविते आणि देश-विदेशातील वारांगना ती आंबटशौकीन ग्राहकांना पुरविते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार तिची संपूर्ण माहिती मिळवून पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मायाला पकडण्याची योजना आखली. त्यानुसार बनावट ग्राहकाने मायासोबत सोमवारी संपर्क साधला. मायाने १० हजार रुपये एकावेळेचा दर सांगून त्याला कोलकाता येथील वारांगना उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. ग्राहकाकडून तिने पाच हजार रुपये अॅडव्हान्स तसेच रूममध्ये जाण्यापूर्वी पाच हजार द्यावे लागेल, अशी बोलणी केली. ग्राहकाने ते मान्य करून मायाला पाच हजार रुपये दिले. मायाने ग्राहकाला रात्री १० वाजता हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये बोलवले. ठरल्याप्रमाणे ग्राहक तेथे पोहचताच त्याच्याकडून मायाने पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला रूम नंबर २०२ मध्ये पाठविले. तेथे कोलकाताची वारांगना तयार होती. काही वेळेनंतर ग्राहकाने पोलिसांना विशिष्ट संकेत दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रूम नंबर २०२ मध्ये छापा घातला. तेथे वारांगनेला ताब्यात घेण्यात आले. तत्पूर्वीच दलाल माया पोलिसांच्या ताब्यात आली होती. हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पकडण्यात आल्याचे लक्षात आल्याने हॉटेल प्रशासन तसेच हॉलमधील पाहुण्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी ज्या रूममध्ये वेश्याव्यवसाय चालत होता, त्या रूमची कसून तपासणी करून तेथून काही आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या.
मायाचे मायाजाल देशभर
कोलकाताची वारांगणा आणि दलाल माया या दोघींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना प्रतापनगर ठाण्यात नेले. तेथे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या मायाचे मायाजाल देशभर पसरले असून, अनेक मोठ्या हॉटेलच्याही ती थेट संपर्कात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हॉटेलमध्ये ती नेहमीच ठिकठिकाणच्या सेक्स वर्कर पोहचवित असावी, असा संशय आहे. या संबंधाने गरज पडल्यास पोलीस हॉटेल प्रशासनातीलही काहींची चौकशी करू शकतात.
१० दिवसांपूर्वीच आली नागपुरात
या संबंधाने लोकमतशी बोलताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, पकडण्यात आलेली ही सेक्स वर्कर १० दिवसांपूर्वी मायाने नागपुरात बोलवून घेतली. तिच्याकडून धंतोलीतील एका बड्या हॉटेलमध्ये आतापर्यंत वेश्याव्यवसाय करवून घेण्यात आला. आता तिला ग्राहकाच्या मागणीनुसार, हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये पाठविण्यात आले. येथे पकडले जाण्यापूर्वी ती किती आणि कोणत्या ग्राहकांसोबत होती, त्याचीही पोलीस चौकशी करणार असल्याचे उपायुक्त कदम म्हणाले.