नागपुरातील उंच राष्ट्रध्वज महाराष्ट्रदिनी फडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:28 AM2019-02-01T00:28:39+5:302019-02-01T00:32:20+5:30
लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात कस्तूरचंद पार्क येथे प्रस्तावित उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) येत्या महाराष्ट्रदिनी फडकणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कामाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. यावर मनपा अधिकाऱ्यांनीही लवकरच कामाला सुरुवात करून दैनंदिन आढावा घेत महाराष्ट्र दिनापर्यंत झेंड्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात कस्तूरचंद पार्क येथे प्रस्तावित उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) येत्या महाराष्ट्रदिनी फडकणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कामाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. यावर मनपा अधिकाऱ्यांनीही लवकरच कामाला सुरुवात करून दैनंदिन आढावा घेत महाराष्ट्र दिनापर्यंत झेंड्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात खास या विषयावर बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, निवाजी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जनार्दन भानुसे, मनपा अभियंता नरेश बोरकर, हेरिटेज कमिटीचे सदस्य, पोलीस निरीक्षक अतुल सबनीस आदींसह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग आणि लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी झेंड्याविषयी माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी कस्तूरचंद पार्क येथे उंच तिरंगा ध्वज उभारण्याबाबतचा निर्णय झाला आहे. जागा व निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाच कोटी रुपये दोन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी कामाला उशीर का होत आहे, अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी कामाबाबतची माहिती दिली. कामाचे टेंडर काढले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली. यावर पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना सूचनावजा निर्देश दिले की, १ मे महाराष्ट्रदिनी नागपुरातील हा उंच राष्ट्रध्वज फडकायलाच हवा. त्यादिशेने कामाचे नियोजन करा. तीन-चार दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला हवी, अशा सूचना केल्या. यावर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी काम सुरू होताच दर दिवशीच्या कामाचा आढावा घ्या, जेणेकरून काम वेळेत पूर्ण होईल, अशा सूचना केल्या. मनपा अधिकाऱ्यांनी या सूचना मान्य करीत वेळेवर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
‘हॉकर्स स्टॅच्यू’चेही होणार सौंदर्यीकरण
दरम्यान संविधान चौकात लोकमतच्याच पुढाकारातून वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रतीक म्हणून हॉकर्स स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी यावेळी सूचना केल्या.