हिंगणघाट जळीत पीडिता दरदिवशी मृत्यूला हुलकावणी देत होती :सात दिवस चिवट झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 08:30 PM2020-02-10T20:30:41+5:302020-02-10T20:33:04+5:30
हिंगणघाट जळीत पीडितेचे सोमवारी पहाटे अचानक हृदयाचे ठोके कमी झाले. पहिला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तातडीने उपाययोजना केल्या. त्यातून ती बाहेरही आली, परंतु तासाभरातच पुन्हा दुसरा झटका आला आणि तिने शेवटचा श्वास घेतला. सात दिवसांपासून सुरू असलेली तिची चिवट झुंज अपयशी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोलच तोंडावर फेकल्याने काही क्षणातच ती ३५ टक्क्यांवर जळली. बाहेरच्या जखमांपेक्षा अंतर्गत जखमा खूपच गंभीर होत्या. श्वसननलिका व फुफ्फुसच क्षतिग्रस्त झाले होते. आवाज गेला होता. डोळ्यांवर सूज असल्याने ते उघडताही येत नव्हते. श्वास घेणेही कठीण झाले होते. त्या स्थितीतह ती शुद्धीवर होती. वेदना सहन करीत प्रत्येक दिवस मृत्यूला हुलकावणी देत होती. तिच्या ‘विल पॉवर’मुळे डॉक्टरही चकित होते. ती वाचायलाच हवी याच प्रयत्नांतून उपचार सुरू होते. परंतु नियतीच्या मनात मात्र, काही वेगळे होते. सोमवारी पहाटे अचानक हृदयाचे ठोके कमी झाले. पहिला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तातडीने उपाययोजना केल्या. त्यातून ती बाहेरही आली, परंतु तासाभरातच पुन्हा दुसरा झटका आला आणि तिने शेवटचा श्वास घेतला. सात दिवसांपासून सुरू असलेली तिची चिवट झुंज अपयशी ठरली.
सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता जळीत पीडितेला हिंगणघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर विशेष रुग्णवाहिकेतून नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांच्या मार्गदर्शनात जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार, क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल व इतर डॉक्टरांच्या मदतीने तातडीने उपचाराला सुरुवात केली. डोके, चेहरा, दोन्ही हात, खांदे, वरचा पाठीचा भाग, संपूर्ण मान, छाती जळाली होती. श्वसननलिकेला व फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली होती. मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अनिल देशमुख व नॅशनल बर्न सेंटरचे डॉ. सुनील केसवानी यांनी पीडितेला भेट दिली. पुढील सात दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉ. केसवानी म्हणाले. जंतू संसर्गाचा धोका ओळखून अतिदक्षता विभागातील दहा खाटा रिकाम्या ठेवल्या. विशेष शस्त्रक्रिया करून जखमांवर मलमपट्टी केली जात होती. गुरुवारी रक्तदाब कमी-जास्त झाला. अॅण्टिबायोटिकचा डोज वाढविण्यात आला. शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे तिला जेवण देण्यात आले. परंतु त्याच दिवशी रात्री श्वास घेणे कठीण झाले. व्हेंटिलेटर लावण्यात आले. जंतू संसर्ग वाढत होता. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी पहाटे ४ वाजता हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यातून तिला बाहेर काढले, परंतु तासाभरानंतर पुन्हा आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात तिची प्राणज्योत मालवली. तिचे कुटुंबच नव्हे तर हॉस्पिटलची चमूही हळहळली.