हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, इन्सिनरेटर मनपाच्या स्वच्छतागृहात
By मंगेश व्यवहारे | Published: April 18, 2023 12:36 PM2023-04-18T12:36:31+5:302023-04-18T12:37:51+5:30
गोकुळपेठ, बुधवारी बाजार, सुगतनगर आणि कळमना येथे स्मार्ट स्वच्छतागृहाची निर्मिती
नागपूर : स्तनदा मातांसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, हॅण्ड ड्रायर अशा अनेक सुविधा नागपूर शहरातील स्मार्ट स्वच्छतागृहात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
शहरात महापालिकेने १.५ कोटी खर्चून गोकुळपेठ, बुधवारी बाजार, सुगतनगर आणि कळमना येथे स्मार्ट स्वच्छतागृहाची निर्मिती केली आहे. गोकुळपेठ व बुधवारी बाजार येथील स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे, तर सुगतनगर व कळमना येथील स्वच्छतागृह प्रगतिपथावर आहे.
या स्वच्छतागृहाला सेन्साॅरवर आधारित स्मार्ट प्रवेशद्वार असून ते उघडण्याची वा बंद करण्याची गरज नाही. स्वच्छतागृहामधील सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकून एक पॅड मिळविता येते. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्याकरिता येथे सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर सुद्धा लावलेले आहे. हॅण्ड ड्रायर, वॉश बेसिनची महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे. पुरुषांच्या स्वच्छतागृहामध्ये चार मुतारी, कमोड व साधे शौचालय आणि बाथरूम आहे. दिव्यांगांकरिता स्वतंत्र कमोड शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगांकरिता स्वच्छतागृहामध्ये व्हिलचेअरची व्यवस्था आहे. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर झाडे लावण्यात आलेले आहेत.
- मुतारी निशुल्क, आंघोळीला गरम पाण्यासाठी ३० रुपये शुल्क
मनपाच्या या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये मुतारीचा वापर नि:शुल्क असून, शौचालयाच्या वापरासाठी सात रुपये, थंड पाण्याने आंघोळीसाठी २० रुपये आणि गरम पाण्याने आंघोळीसाठी ३० रुपये शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे.