हिस्लॉप महाविद्यालय चॅम्पियन; जी. एस. कॉलेज उपविजेते
By आनंद डेकाटे | Published: March 23, 2024 02:16 PM2024-03-23T14:16:00+5:302024-03-23T14:16:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : युवारंग युवा महोत्सवाचा समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित 'युवारंग' या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयाने पटकावले. जी. एस. महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकावर राहिले. गोल्डन बॉयचा पुरस्कार सत्यजित तर गोल्डन गर्लचा पुरस्कार इंद्राणी इंदुरकरने पटकाविला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने गुरुनानक भवन येथे आयोजित युवा रंगाचा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी प्र-कलगुरु डॉ. संजय दुधे होते. पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी केली. हिस्लॉप महाविद्यालयाने संगीत, नृत्य आणि थिएटर प्रकारातील ट्रॉफी देखील पटकावली. साहित्य स्पर्धा प्रकारातील ट्रॉफी विद्यापीठाचा पदव्युत्तर विधी विभाग आणि जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सने पटकावली. ललित कला प्रकारातील ट्रॉफी एम. जे. कॉलेज व जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सने पटकावली.
शास्त्रीय संगीत स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पार्वती नायर तर, सुगम संगीत मध्ये श्रेयश मासुरकर, शास्त्रीय ताल मध्ये सुयोग देवलकर, ताण वाद्य मध्ये यशोधन देशपांडे, समूहगीत मध्ये हिस्लाॅप महाविद्यालय नागपूर, सोलो मध्ये आदी रिंगे, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो मध्ये हर्षद मौंदेकर, वादविवाद स्पर्धा मध्ये जी.एस. महाविद्यालय नागपूर, प्रश्नमंजुषामध्ये विद्यापीठाचा पदव्युत्तर विधी विभाग, पेंटिंग स्पर्धेमध्ये प्रीती भौमिक, पोस्टर स्पर्धेमध्ये निधी भुसारी, कोलाज मध्ये प्रियंका मन्ना, कार्टूनींगमध्ये शिवम नंदगेवे, क्ले मॉडलिंग मध्ये निलाक्षी पराते, रांगोळी स्पर्धेमध्ये मयुरी वानी, स्किट स्पर्धेमध्ये हिस्लाॅप महाविद्यालय नागपूर, माइम स्पर्धेमध्ये श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर, मिमिक्री स्पर्धेमध्ये भुवन मेश्राम, शास्त्रीय नृत्य इंद्राणी इंदुरकर, लावणी स्पर्धेमध्ये आस्था वांधारे, लोकनृत्य स्पर्धेत हिस्लाॅप महाविद्यालय नागपूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.