हा तर दिवंगत साहित्यिकांचा ऐतिहासिक संदर्भग्रंथ : पंकज चांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:39 PM2019-02-26T21:39:49+5:302019-02-26T21:41:42+5:30
पुण्या-मुंबईकडे त्या भागातील साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात. विदर्भ मात्र अशा प्रसिद्धीबाबत दुबळा राहिला आहे. अशा परिस्थितीत नागपुरात झालेल्या अनेक साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी असलेला ‘अक्षरतर्पण’ हा ग्रंथ मोलाची भूमिका बजावणारा आहे. भविष्यात दिवंगत साहित्यिकांचे संदर्भ शोधताना या ग्रंथाचा उलगडा करावा लागेल. त्यामुळे हा ग्रंथ ऐतिहासिक मोलाचा असल्याचे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्या-मुंबईकडे त्या भागातील साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात. विदर्भ मात्र अशा प्रसिद्धीबाबत दुबळा राहिला आहे. अशा परिस्थितीत नागपुरात झालेल्या अनेक साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी असलेला ‘अक्षरतर्पण’ हा ग्रंथ मोलाची भूमिका बजावणारा आहे. भविष्यात दिवंगत साहित्यिकांचे संदर्भ शोधताना या ग्रंथाचा उलगडा करावा लागेल. त्यामुळे हा ग्रंथ ऐतिहासिक मोलाचा असल्याचे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबईद्वारा पुरस्कृत व साहित्य विहार संस्थाद्वारा निर्मित ‘अक्षरतर्पण’ या दिवंगत साहित्यिकांच्या संदर्भकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीचे सोमवारी धनवटे सभागृहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी साहित्य विहारच्या अध्यक्षा आशा पांडे, डॉ. प्रज्ञा आपटे, मदन कुळकर्णी, श्यामकांत कुळकर्णी, प्रा. सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. चांदे पुढे म्हणाले, प्रत्येक साहित्यिकांचे वेगळे वैशिष्ट्य असते. कुणाचे अधिक तर कुणाचे कमी ग्रंथ असले तरी गुणवत्तेप्रमाणे त्यांचे मोल असते. अशा प्रतिभावंतांचे जाणे दु:खदायक असते. अनेकदा त्यांच्या रक्ताचे नाते असलेल्या घरच्यांकडूनही त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही. त्या दृष्टीने हा संदर्भग्रंथ मौल्यवान आहे. व्यावहारिक पातळीवर अशा माणसांचे विस्मरण होते. अशा माणसांचे स्मरण करणे व त्यांना अमरत्त्व देणे अतिशय महत्त्वाचे काम असून अभ्यासाच्या दृष्टीनेही मोलाचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
डॉ. मदन कुळकर्णी म्हणाले, माणसांना मरण येईल पण ग्रंथ अमर असतात. आज सर्वांना प्रत्येक गोष्ट ताबडतोब हवी असते. मात्र अभ्यासाशिवाय काहीही शक्य नाही. हा ग्रंथ तयार करणे जटील व किचकट काम होते. आता मात्र शाळा-महाविद्यालयाच्या ग्रंथालयी संग्रही ठेवावा असा ग्रंथ तयार झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. डॉ. प्रज्ञा आपटे यांनी या संदर्भग्रंथाबाबत माहिती दिली. २००७ साली ही संकल्पना पुढे आली व ११ वर्षानंतर ती पूर्णत्वास आली. काळाच्या पडद्याआड गेलेल्या विदर्भातील लहानमोठ्या ९५ साहित्यिकांचा या दुसऱ्या आवृत्तीत मागोवा घेतला आहे. या केवळ लेखकांच्या कार्यकर्तृत्वाच्या भावपूर्ण आलेख, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ऐतिहासिक दस्ताऐवज झाला असल्याचे त्या म्हणाल्या. लवकरच याचे ई-बुकही काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा पांडे यांनी हा ग्रंथ तयार करण्यामागची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. माधुरी वाघ यांनी केले.