नागपूरचा ऐतिहासिक वारसा : ऐतिहासिकतेची साक्ष पटविणारे कस्तूरचंद पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:24 PM2019-04-20T23:24:24+5:302019-04-20T23:25:19+5:30
उपराजधानीच्या अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ‘कस्तूरचंद पार्क’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर खेळविणारे हे मैदान म्हणजे दिवाणबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी शहराला दिलेली अमूल्य भेट होय. ब्रिटिश काळात होणारे सैन्याचे आणि आता पोलीस जवानांचे पथसंचलन, गणराज्य दिनाची परेड अशा गोष्टी, विविध खेळांच्या स्पर्धा असा इतिहास या मैदानावर घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ‘कस्तूरचंद पार्क’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर खेळविणारे हे मैदान म्हणजे दिवाणबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी शहराला दिलेली अमूल्य भेट होय. ब्रिटिश काळात होणारे सैन्याचे आणि आता पोलीस जवानांचे पथसंचलन, गणराज्य दिनाची परेड अशा गोष्टी, विविध खेळांच्या स्पर्धा असा इतिहास या मैदानावर घडला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या एक कि.मी.च्या अंतरावर व ११८ बटालियन कॅम्पच्या समोर १२ एकरामध्ये हे विस्तीर्ण मैदान पसरलेले आहे. एकोणिसाव्या शतकात राजस्थानच्या बिकानेरहून आलेले उद्योगपती कस्तूरचंद डागा यांनी नागपूर शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शहर आणि शहराच्या आसपास वस्त्रोद्योग, कोळशाची खाण अशा अनेक उद्योगांचा पाया त्यांनी रोवला. विशेष म्हणजे त्यांच्या उद्योगाचा विस्तार नागपूर ते रंगून आणि कराची ते ढाकापर्यंत पसरला होता. उद्योगपती असण्यासह दानशूर व्यक्ती म्हणूनही ते ख्यातनाम होते. त्यांचे सामाजिक कार्य पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना सर आणि दिवाणबहादूर अशा उपाधी बहाल केल्या होत्या. त्यांनीच सीताबर्डी किल्ल्यासमोर असलेली ही मोकळी जागा शहरासाठी दान केली. त्रिकोणी आकारात असलेल्या या मैदानाच्या मध्यभागी राजस्थानी शैलीतील आकर्षक घुमट असलेला चबुतरा तयार करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात सीताबर्डी किल्ल्यातील सैन्याच्या तुकड्या या मैदानावर पथसंचलन करायच्या आणि वरिष्ठ अधिकारी या चबुतºयावर बसून पथसंचलनाची देखरेख करायचे. शिस्तबद्ध घोड्यांचेही संचलन येथे होत असे. हे पथसंचलन बघायला शहरातील लोकांची गर्दी होत असल्याची माहिती जाणकार सांगतात. त्यावेळी मैदानाच्या सर्व बाजूला उंच वृक्ष होते. १९१७ साली सर डागा यांच्या निधनानंतर मैदानाच्या एका बाजूला त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. सर डागा यांनी पाकिस्तानच्या रावळपिंडी येथेही अशीच जागा दान केली होती व त्या मैदानाचे नावही कस्तूरचंद पार्क असेच ठेवण्यात आले आहे.
पूर्वी या मैदानावर फुटबॉल, सायकल पोलो, धनुर्विद्या, दौड आदी स्पर्धा घेतल्या जायच्या. या स्पर्धांमधून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडले आहेत. २००६ साली सायकल पोलो स्पर्धा घेण्यात आली होती. पुढे प्रदर्शन, संगीत कार्यक्रम आदींसारख्या व्यावसायिक उपयोगामुळे मैदान खराब होऊ लागल्याने या स्पर्धा बंद होत गेल्या.
२०१० साली तर निर्धारित असलेली सायकल पोलो स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पुढे मात्र ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यता मिळाल्यानंतर व्यावसायिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर २०१७-१८ मध्ये महापौर चषकांतर्गत पुन्हा सायकल पोलोचे आयोजन करण्यात आले होते.
विस्तीर्ण मैदान असल्याने आजही या मैदानावर एका बाजूला मुले क्रिकेट व इतर खेळांचा आनंद घेताना दिसतात. सकाळी नागरिकांचे फिरणे, योगासने व व्यायाम करताना लोक दृष्टीस पडतात. कधी कधी पोलिसांची परेडही येथे होते. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी होणारा रावण दहन हा महत्त्वाचा सोहळा या मैदानावरच घेतला जातो. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांसाठीही या मैदानालाच पसंती दिली जाते. अशा या ऐतिहासिक मैदानावर लोकमतच्या पुढाकाराने गगनचुंबी राष्ट्रध्वज उभारण्यात येणार असून, मैदानाच्या नूतनीकरणासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविले जाणार आहेत.