नागपूर : चार दिवस रात्री गारठा जाणवल्यानंतर पारा पुन्हा चढायला लागला आहे. गुरुवारी किमान तापमान सरासरीपेक्षा १.५ अंशाने कमी असले तरी २४ तासांत २.१ अंशाची वाढ झाली आहे. पुढचे पाच दिवस यात २ ते ३ अंशाची वाढ हाेणार असून थंडीचा जाेर काहीसा कमी हाेणार आहे. मात्र थंडी कायमची गेली असे समजू नये, कारण पुढच्या आठवड्यात पारा घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने नाेंदविला आहे.
गुरुवारी नागपूरचे किमान तापमान १४.७ अंश नाेंदविले गेले. यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमानात २४ तासांत वाढ नाेंदविण्यात आली आहे. सर्वात कमी गडचिराेलीत १२.६ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. अमरावतीमध्ये २४ तासांत सर्वाधिक ३.४ अंशाने पारा चढला व १३.६ अंशाची नाेंद झाली, पण सरासरीपेक्षा ताे अद्याप ३.३ अंशाने कमी आहे. अमरावती व गाेंदिया वगळता सर्व जिल्ह्यात पारा १४ ते १६ अंशापर्यंत पाेहोचला आहे. पुढचे काही दिवस किमान तापमान आणखी वाढणार आहे. दरम्यान १८ फेब्रुवारीला नवीन पश्चिम झंझावात काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये प्रवेशित हाेण्याची शक्यता असून त्यामुळे पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता आहे. या प्रभावाने विदर्भासह महाराष्ट्रातही २२ फेब्रुवारीपासून रात्रीचा पारा घसरून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे.
यादरम्यान दिवसाचा पारा मात्र झपाट्याने उन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नागपुरात गुरुवारी ३५.१ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा २.९ अंशाने अधिक आहे. सर्वाधिक ३७.८ अंश तापमान अकाेल्यात नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा ४.९ अंश अधिक आहे. वर्ध्यात कमाल तापमान ४.४ अंशाच्या वाढीसह ३६.६ अंशावर गेले तर अमरावतीतही ४.१ अंशाच्या वाढीसह ३६.२ अंशावर पाेहचले. गाेंदिया ३३.५ व गडचिराेली ३२.८ अंश वगळता इतर सर्व जिल्ह्यात पारा ३४ ते ३५ अंशाच्या सरासरीत आहे. फेब्रुवारीतच उन्हाळा लागण्याची ही चाहुल हाेय.