मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे आलेले संकट जागतिक आहे. वेळीच पावले उचलून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. त्याअंतर्गत पर्यटन आणि जंगल सफारीवर बंदी टाकली आहे. समारंभ, परिषदा आणि अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देश-विदेशातील प्रवाशांचा नागपुरात येण्याचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे लहान-मोठ्या हॉटेल्समधील ८० ते ९० टक्के खोल्या रिकाम्या आहेत. या सर्वांचा परिणाम नागपुरातील हॉटेल्स व्यवसायावर झाला असून, मार्च महिन्यात या व्यवसायाला जवळपास १०० कोटींचा फटका आहे. पुढे त्यात वाढ होणार आहे.कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय कोसळला आहे. खोल्यांच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायाला अनेक हादरे बसत आहेत. पण कोरोनाचा फटका हा या संकट मालिकेतील भीषण अध्याय ठरत आहे. वर्षभरापासून आखणी केलेल्या सहली रद्द झाल्या आहेत. जवळपास पंचतारांकित हॉटेल्स चार असून, लहान-मोठी २०० पेक्षा जास्त निवासी हॉटेल्स आणि लॉज आहेत. यामध्ये एकंदरीत दोन हजारांपेक्षा जास्त खोल्या आहेत. पंचतारांकित हॉटेल्समध्ये लग्नसमारंभ, विशेष समारंभ आणि परिषदांचे आयोजन नियमितपणे होतात. याशिवाय नागपुरात येणारे पर्यटक या हॉटेल्समध्ये थांबतात. अशावेळी या हॉटेल्समध्ये चहलपहल बघायला मिळते. पण प्रतिबंधक उपाय म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देश-विदेशातील पर्यटक येणे बंदच आहे.
कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट?कोरोनामुळे हॉटेल्स व्यवसाय डबघाईस आल्याने अनेक हॉटेल्सने कर्मचाऱ्यांना कामावरून हटविल्याचे वृत्त येत आहे. पण त्यावर नकार देताना संचालक म्हणाले, कोरोनामुळे हॉटेलची नियमित देखरेख कठीण झाली आहे. खर्च तेवढाच असून उत्पन्न कमी आहे. हे संकट लवकरच दूर होऊन सर्वकाही सुरळीत होऊन हॉटेल व्यवसायात सुगीचे दिवस येण्याची अपेक्षा आहे. हे दिवस लवकरच येणार आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेले नाही. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्क दिले आहेत. सर्वच कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात येत आहे.