नागपूर : राज्य सरकारने राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यासाठी आखून दिलेल्या पाचस्तरीय (लेव्हल) व्यवस्थेचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लेव्हल-१ नियमांतर्गत दुकाने रात्री ८ पर्यंत आणि हॉटेल्स व रेस्टॉरंट रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) राज्य सरकारकडे केली आहे.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, नागपूर लेव्हल-१ मध्ये असल्याने दुकाने रात्री ८ पर्यंत आणि हॉटेल्स व रेस्टॉरंट रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यानंतरही सरकारने दुकाने, हॉटेल्स व रेस्टॉरंटला दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध टाकले आहे. राज्य सरकारने ७ जूनला संक्रमण आणि उपलब्ध खाली बेडच्या आधारावर लेव्हल-१ ते ५ पर्यंत जिल्ह्यांना वर्गीकृत करून अनलॉकचे निर्देश दिले होते. जून महिन्यापासून संक्रमणाचा दर ०.५ टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यानंतरही स्थानिक प्रशासनाने नागपूरला लेव्हल-३ मध्ये टाकून दुकाने, हॉटेल्स व रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात चेंबरच्या प्रतिनिधी मंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नागपूरला लेव्हल-१ मध्ये टाकून व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी केली आहे. वर्षापासून लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे उत्पन्न कमी झाले असून, प्रतिष्ठानाचा खर्च उचलणे कठीण झाले आहे.
चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, स्थानिक प्रशासनाच्या निर्देशामुळे व्यवसाय, रेस्टॉरंट, लग्नाचे हॉल व लॉन बंद होण्याच्या मार्गावर असून, कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. गेल्या वर्षी हॉटेल इंडस्ट्रीला नोव्हेंबर २०२० पासून अनलॉक केले होते. मार्च २०२१ पासून या व्यवसायावर पुन्हा लॉकडाऊनचे संकट आले आहे. त्यामुळे दुकाने, हॉटेल्स व रेस्टॉरंटवर सरकारने वेळेचे निर्बंध टाकू नयेत.
मंत्र्यांना निवेदन देताना चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव स्वप्निल अहिरकर, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिग रेणू, हॉटेल सेंटर पॉईंटचे मिक्की अरोरा, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विष्णू पचेरीवाला, तरुण निर्बाण, प्रकाश त्रिवेदी आणि दीपक खुराणा उपस्थित होते.