आॅनलाईन लोकमतनागपूर : शहराची ओळख देशातील ‘ग्रीनसिटी’ अशी व्हावी, असा प्रयत्न सुरू असताना काही जणांकडून मात्र विनापरवानगी झाडे कापण्याचे पाऊल उचलण्यात येत आहे. मनपाने यासंदर्भात कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासकीय अनास्था इतकी आहे की मागील पाच वर्षांत शहरात बेकायदेशीररीत्या किती झाडे तोडण्यात आली व दंडाच्या माध्यमातून किती महसूल प्राप्त झाला, याची माहितीदेखील मनपाच्या उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाऱ्यात मनपाच्या उद्यान विभागाकडे विचारणा केली होती. मागील पाच वर्षांत विनापरवानगी किती झाडे तोडण्यात आली, दंडापोटी किती महसूल प्राप्त झाला, या वर्षी ‘व्हीएनआयटी’मध्ये किती झाडे तोडण्यात आली, किती संस्थांनी परवानगी मागितली व त्यासाठी मनपाने किती ‘डिपॉझिट’ घेतले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत विनापरवानगी तोडण्यात आलेल्या झाडांची माहिती मनपाने संकलितच केलेली नाही. मनपाच्या या उत्तरातूनच अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.११ महिन्यांत विनापरवानगी ३५० झाडांची कत्तलदरम्यान, मनपाने २०१७ ची आकडेवारी उपलब्ध करुन दिली असून १ जानेवारी ते १५ डिसेंबर या कालावधीत शहरात विनापरवानगी ३५३ झाडाची कत्तल करण्यात आली. यात ‘व्हीएनआयटी’तील ६२ झाडांचा समावेश आहे. झाडे कापलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याचे मनपाने स्पष्ट केले. दरम्यान मनपाच्या दहाही झोनमध्ये लोकसहभागातून ९ महिन्यांत ३२ हजार ४७१ वृक्षांची लागवड करण्यात आली.